कोकणातील ‘शिमगोत्सव’ माहितीपटातून रसिकांच्या भेटीला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोकणातील शिमगा सगळ्या चाकरमानींच्या हृदयातला हळवा कोपरा! कोकणातील माणूस कामधंद्यासाठी कितीही लांब गेलेला असला तरी होळी आणि गणपतीच्या सणांना त्याचे पाय आपोआप गावाकडे वळतात. कोकणातला शिमगोत्सव म्हणजे विविध वैशिष्टय़पूर्ण पद्धती, परंपरा, लोककला यांचा आविष्कार असतो. फाल्गुन शुद्ध पंचमीपासून साधारणतः गुढीपाडव्यापर्यंत हा उत्सव मोठय़ा उत्साहाने साजरा केला जातो. बाहेरगावी असलेले चाकरमानीही हमखास शिमगोत्सवासाठी गावी येतात. ग्रामदेवतेच्या पालख्या गावागावांत फिरत असतात आणि सगळीकडे एक वेगळेच जल्लोषाचे वातावरण असते. या पालख्या का नाचवतात? कशा नाचवतात? होळी कशी आणतात? गावागावातल्या वेगवेगळ्या प्रथा-परंपरा कशा असतात, अशा प्रश्नांची उत्तरं आगामी ‘शिमगोत्सव-प्रथा आणि परंपरा’ या माहितीपटातून मिळणार आहेत. आशीष निनगुरकर लिखित-दिग्दर्शित या माहितीपटाच्या चित्रीकरणाचा मुहूर्त नुकताच पार पडला. या माहितीपटाचे संपूर्ण चित्रीकरण हे वांद्री, उक्षी व आंबेड गावात होणार आहे. विविध आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात हा माहितीपट प्रदर्शित केला जाणार आहे.

– पालख्या का नाचवतात? कशा नाचवतात? होळी कशी आणतात? गावागावातल्या वेगवेगळ्या प्रथा-परंपरा कशा असतात, अशा प्रश्नांची उत्तरं ‘शिमगोत्सव-प्रथा आणि परंपरा’ या माहितीपटातून मिळतील.