
जागोजागी पडलेले खड्डे आणि प्रशासनाचा नियोजनशून्य कारभार यामुळे गणपतीसाठी गावाला जाताना ट्रॅफिकच्या चक्रव्यूहात अडकलेल्या चाकरमान्यांचा आज परतीच्या प्रवासातही मोरया झाला. गौरी-गणपतीचे विसर्जन करून मुंबईकडे निघालेले चाकरमानी सकाळपासूनच मुंबई-गोवा महामार्गावर तासन्तास वाहतूककोंडीत अडकून पडले. दुपारनंतर त्यात आणखी भर पडली. संध्याकाळी तर माणगाव, इंदापूर, लोणेरे, कोलाड येथे पाच किलोमीटरच्या लांबच लांब रांगा लागल्या. त्यामुळे पोलादपूर ते पळस्पे हे 155 किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी तब्बल सात ते आठ तास लागल्याने चाकरमान्यांचे प्रचंड हाल झाले.
मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर, पुणे येथील लाखो चाकरमानी आज परतीच्या प्रवासाला निघाले. स्वतःची वाहने नसलेल्या चाकरमान्यांनी कोकणातील सगळय़ाच एसटी स्थानकांत प्रचंड गर्दी केली. प्रवाशांचा ओव्हरलोड, परंतु त्या तुलनेत एसटय़ांची तुटपुंजी व्यवस्था यामुळे चाकरमान्यांना तासन्तास ताटकळावे लागले.
माणगावजवळ जांगडगुत्ता
खासगी वाहनांतून सकाळी निघालेल्या चाकरमान्यांना तेच खड्डे, तीच रखडलेली बायपासची कामे, ठिकठिकाणी लटकलेली मोऱयांची कामे त्याचा सामना करावा लागला. मुंबईकडे येणाऱया लेनवर माणगाव, इंदापूर, लोणेरे, कोलाड परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. त्यामुळे वाहतूक मुंगीच्या पावलाने सुरू होती. माणगाव गावात अरुंद रस्त्यामुळे वाहतुकीचा मोठा जांगडगुत्ता झाला. त्यामुळे पोलादपूर ते पळस्पे हे 155 किमीचे अंतर पार करण्यासाठी सात ते आठ तासांचा वेळ लागला.