
मद्यपान करून एसटी बस चालवणाऱया चालकांमुळे होणाऱया अपघातांच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाकडून जिह्यात कडक कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली आहे. आज दिवसभरात जिह्यात 1 हजार 700 एसटी बसचालकांची ‘अल्कोहोल’ तपासणी करण्यात आली. यामध्ये पलूस आगारामधील चालक शहाजी शेडगे याने मद्यपान केल्याचे निदर्शनास आल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. ही मोहीम उद्या सकाळपर्यंत चालू राहणार असल्याची माहिती विभागीय वाहतूक नियंत्रकाकडून देण्यात आली आहे.
एसटी महामंडळाच्या ताफ्यात खासगी ठेकेदारांच्या गाडय़ा भाडेतत्त्वावर चालविल्या जातात. यात शिवशाही, शिवनेरी बसचाही समावेश आहे. भाडेतत्त्वावरील गाडय़ांना चालक पुरविण्याचे कामही खासगी ठेकेदारच करत असतात. पुणे येथे खासगी ठेकेदाराच्या शिवशाही बसचा चालक मद्यपान करून बस चालवत असल्याची घटना उघडकीस आल्यानंतर प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित झाला.
महाराष्ट्र राज्यमार्ग परिवहन महामंडळाने याची गंभीर दखल घेतली आहे. त्यानुसार एसटी महामंडळाच्या ताफ्यातील सर्व एसटी बसचालकांची प्रत्येक फेरीपूर्वी ‘अल्कोहोल’ तपासणी करण्याचा निर्णय घेऊन, त्यानुसार कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानकाच्या ठिकाणी आज पहाटे पाच वाजल्यापासून तपासणीची मोहीम सुरू करण्यात आली. बाहेरून बस घेऊन येणाऱया प्रत्येक एसटी बसचालकाची ‘ब्रेथ ऍनालायझर’द्वारे अल्कोहोल तपासणी करण्यात आली.
‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ हे ब्रीदवाक्य घेऊन एसटी खेडोपाडय़ात जात असते. त्यामुळे एसटीवर प्रवाशांचा असलेल्या दृढ विश्वासाला तडा जाऊ नये, एसटीची प्रतिमा मलिन होऊ नये, यासाठी मद्यपान करणाऱया चालकांच्या तपासणीसाठी सुरू केलेल्या या मोहिमेत प्रत्येक आगाराचे अधिकारी तसेच सुरक्षा आणि दक्षता विभागाचे कर्मचारी अशा पाचजणांचे पथक नियुक्त करण्यात आले आहे. आज सकाळी सात वाजेपर्यंत ही मोहीम सुरू राहणार असल्याची माहिती विभागीय वाहतूक नियंत्रक संतोष बोगरे यांनी दिली.




























































