कोल्हापूर – अंबाबाई मंदिरात ललित पंचमीला कोहळा मिळविण्यासाठी पोलिसांचीच झुंबड

नवरात्रोत्सवातील ललित पंचमीला प्रतिवर्षी हजारो भाविकांच्या उपस्थितीत होणारी करवीर निवासिनी श्रीअंबाबाई आणि त्र्यंबोली देवीची भेट यंदा कोरोना संसर्गाच्या पार्श्वभुमीवर साधेपणाने झाली. टेंबलाई टेकडीवर निवडक मान्यवरांच्या उपस्थितीत परंपरेनुसार कोहळा फोडण्याचा विधी झाला. प्रचंड पोलीस बंदोबस्तामुळे परिसराला पोलीस छावणीचे स्वरुप प्राप्त झाले होते.यंदा भाविक कमी पण पोलिसच अधिक असल्याने, कोहळा मिळविण्यासाठी पोलिसांचीच झुंबड उडाल्याचे दिसून आले.

कोल्हासुर राक्षसाचा वध केल्यानंतर झालेल्या विजयोत्सवात लहान बहिण श्रीत्र्यंबोली देवीला बोलवायचे विसरल्याने,तिचा रुसवा सोडविण्यास श्रीअंबाबाई स्वत: लवाजम्यासह टेंबलाईवाडी टेकडीवर जाते.यावेळी राक्षसाचा वध कसा केला हे दाखविण्यासाठी कोहळा फोडुन दाखविते अशी अख्यायिका आहे.यानुसार दरवर्षी ललित पंचमीला हजारो भाविकांच्या उपस्थितीत हा सोहळा होतो.यंदा कोरोनामुळे नवरात्रोत्सवातील सर्वच कार्यक्रम भाविकांविना सुरु आहेत.

परंपरेनुसार आज सकाळी साडे नऊच्या सुमारास तोफेच्या सलामीनंतर श्रीअंबाबाईची पालखी मंदिराच्या पूर्व दरवाजातून बाहेर येऊन,जुना राजवाड्यातील नगारखान्यापासुन फुलांनी सजवलेल्या वाहनात पारंपरिक लवाजम्यासह टेंबलाईच्या भेटीसाठी मार्गस्थ झाली.याचवेळी श्री तुळजाभवानीच्या पादुका व छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती विराजमान केलेली पालखीही टेंबलाईच्या भेटीसाठी तुळजाभवानी मंदिरातून बाहेर पडली.पारंपारिक मार्गावरुन दुपारी पावणे बारा वाजण्याच्या सुमारास पालखी टेंबलाई टेकडीवर दाखल झाली.प्रथम श्रीअंबाबाई आणि श्रीत्र्यंबोलीदेवीची भेट झाली.कोल्हासूर राक्षसाचे प्रतिक असलेल्या कोहळाचे श्रीमंत मालोजीराजे छत्रपती यांच्या हस्ते पुजन झाले.यानतंर कुमारिका निधी गूरव हिने त्रिशुलाने प्रतिकात्मक कोहळा रुपी राक्षचा वध केला.यावेळी कोहळा चा तुकडा मिळविण्यासाठी एकच झुंबड उडाली होती.

आपली प्रतिक्रिया द्या