करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात 64 योगिनी पूजन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

श्रावण महिन्यातील पिठोरी अमावास्येनिमित्त करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरातील परिवार देवता असणाऱया आणि भक्तांना शुभाशुभ फल देण्याचा अधिकार ज्यांना प्रत्यक्ष जगदंबेने दिला आहे, अशा 64 योगिनींचे पूजन विधिवत करण्यात आले.

करवीर निवासिनी श्रीअंबाबाई मंदिराच्या भिंतींवर साक्षी विनायकापासून गोपाल कृष्णापर्यंत 64 योगिनींची शिल्पे साकारलेली आहेत. जगदंबेच्या दर्शनाला येणाऱया भक्तांना शुभाशुभ फल देण्याचे अधिकार प्रत्यक्ष आदिमातेने या योगिनींना दिले आहेत. त्यामुळे श्रीजगदंबेच्या दर्शनानंतर या योगिनींचे दर्शनही भक्तांनी करावे, असे सांगितले गेले आहे.

प्रतिवर्षी पिठोरी अमावास्येला या 64 योगिनींची विधिवत षोडोशोपचार पूजा केली जाते. आजही परंपरेप्रमाणे हे पूजन पार पडले. वेदमूर्ती महामहोपाध्याय सुहास जोशी यांच्या मार्गदर्शनानुसार श्रीपूजक अजित ठाणेकर, माधव मुनीश्वर यांनी संकल्प आणि पूजन केले. यामध्ये आवाहन, स्नान, धूप, दीप नैवेद्य आदी षोडशोपचारांचा समावेश असतो. तर, दीपा ठाणेकर, राधिका ठाणेकर, मोहिनी दिवाण, अश्विनी ठाणेकर, अमिता ठाणेकर, उर्मिला ठाणेकर, गौरी जोशी आणि प्रियांका जोशी यांनी योगिनींसह मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाविक महिलांचे ओटीभरण करून त्यांना प्रसाद दिला.