
शारदीय नवरात्रौत्सवाच्या पहिल्याच दिवशी मंदिरे उघडल्याने,भाविक समाधानाने दर्शन करत असतानाच,एका अज्ञात विकृताने यामध्ये बाधा आणण्याचा प्रयत्न केला. करवीर निवासिनी श्रीअंबाबाई मंदिरात पुजेच्या ठिकाणी बॉम्ब असल्याचा निनावी फोन करुन, भाविकांसह पोलिसांना वेठीस धरण्याचा ” असुरी ” प्रयत्न केला. दरम्यान पोलिसांनीही तातडीने धाव घेत तपासणी केली असता ही अफवा असल्याचे स्पष्ट झाले. तासाभराने पुन्हा भाविकांना सुरळीत दर्शन घेण्यासाठी सोडण्यात आले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन वेळा मंदिरे बंद करावी लागली होती.कोरोना संसर्गाचा जोर कमी होताच नवरात्रोत्सवापासून विशेष खबरदारी घेऊन,सर्व प्रार्थनास्थळे सुरू करण्यात आली. मंदिरे उघडल्याने सकाळपासून श्रीअंबाबाई मंदिरात ईपास धारक भाविकांच्या दर्शनासाठी रांगा लागल्या. सर्वत्र उत्साह व चैतन्यमय वातावरण असतानाच सायंकाळी चारच्या सुमारास अज्ञाताने करवीर निवासिनी श्रीअंबाबाई मंदिरात पूजेच्या ठिकाणी बॉम्ब ठेवण्यात आल्याची माहिती निनावी फोन करुन पोलीस मुख्यालयात दिली. घटनेची वरिष्ठ स्तरावर गांभिर्याने दखल घेत पोलिसांची बॉम्बशोधक पथक व श्वानपथके ताबडतोब मंदिराकडे रवाना केली. यावेळी तातडीने मंदिर परिसर मोकळा करण्यात आले. दर्शन रांगेपासून भाविकांना दुर करण्यात आले. शोधपथकामुळे तब्बल दीड तास मंदिरात भाविकांना दर्शनासाठी सोडण्यात आले नाही.
सर्वत्र कसून तपासणी केल्यानंतर संशयास्पद काहीच वस्तू आढळून आली नाही. खात्री करुन भाविकांसाठी दर्शन रांगा सुरळीत करण्यात आल्या.यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे,अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे,शहर पोलीस उपाधीक्षक मंगेश चव्हाण, जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे पो.निरीक्षक दत्तात्रय नाळे हे सुद्धा मंदिरात दाखल झाले.
निनावी दूरध्वनीमुळे नवरात्र उत्सवाच्या पहिल्याच दिवशी पोलीस व सुरक्षा यंत्रणेची तारांबळ उडाली.यानंतर पोलिसांनी आणखी कडक तपासणी व बंदोबस्त वाढविली.





























































