
राज्यात आणि जिल्ह्यांत वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून करवीर निवासिनी श्रीअंबाबाई मंदिरात दर्शन वेळेत आता बदल करण्यात आला आहे. शासन निर्णयानुसार सर्व भाविकांना मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. ईपास,अभिषेक बंद करण्यात आले असून सोशल डिस्टंन्ससह सॅनिटायजर हातावर घेऊन दर्शनाला सोडले जाईल. तसेच मंदिर परिसरात फोटो काढताना आढळल्यास संबंधितांचे मोबाईल फोन जप्त करण्यात येणार असल्याचे प.महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी सांगितले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षी मार्चपासून श्रीअंबाबाई मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले होते.दोन महिन्यांपूर्वी भाविकांना दर्शनासाठी काही नियमावली घालुन मंदिर खुले करण्यात आले होते. त्यानंतर दर्शनाची सकाळी 6 ते रात्री 8 अशी वेळ होती. पण सध्या कोरोना संसर्ग पाहता,प.महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने खबरदारी म्हणून दर्शनाच्या वेळेत बदल केला आहे. त्यानुसार दि.25 फेब्रुवारी 2021 पासून सकाळी 7 ते दुपारी 12 आणि दुपारी 3 ते रात्री 8 या वेळेत भाविकांना देवीचे दर्शन घेता येणार आहे.दुपारी 12 ते 3 यावेळेत मंदिर पूर्णपणे बंद रहाणार आहे
याशिवाय मंदिरात भाविकांकरवी करण्यात येणारे अभिषेक सारखे धार्मिक विधी,भावीकांसाठी केलेली ई-पासची सुविधा देखील बंद करण्यात आली आहे.मंदिराच्या पुर्व व पश्चिम दरवाजातून दर्शन सुरु राहणार असुन,पुर्व दरवाजाकडील मंडप तसेच मुख दर्शनास येणाऱ्या भाविकांना रांगेत सामाजिक अंतर राखण्यासाठी आवश्यक मार्कीग करण्यात येणार आहे.मंदिरात येताना मास्क,सॅनिटायझर व भाविकांचे तापमान तपासणी सुरु असुन,याची कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे.मंदिरात विना मास्क आढळल्यास 200 रूपये दंड तसेच मंदिर परिसरात भाविकांना जास्त वेळ थांबण्यास मज्जाव करण्यात आला असून,कोणत्याही प्रकारे छायाचित्र, व्हिडीओ, सेल्फी काढल्यास मोबाईल,कॅमेरे जप्त करुन 200 रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे यासंदर्भात मंदिरातील गरुड मंडपात झालेल्या बैठकीस जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव,देवस्थान समितीचे सचिव विजय पोवार,पुजारी प्रतिनिधी माधव मुनिश्वर आदी उपस्थित होते.



























































