अंबाबाईच्या व्हीआयपी दर्शन रांग, पेड ई-पासला परवानगी नाकारली

यंदा नवरात्रोत्सवात करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिरात व्हीआयपी दर्शनाऐवजी पेड पास देण्याचा पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने घेतलेल्या निर्णयाला आज येथील दिवाणी न्यायालयाने दणका दिला. तिसरे दिवाणी न्यायाधीश के. आर. सिंघेल यांनी या संदर्भात निर्णय देताना मंदिरातील व्हीआयपी दर्शन रांग आणि पेड पासला स्पष्टपणे परवानगी नाकारली आहे.

नवरात्रोत्सवात साडेतीन शक्तिपीठांपैकी एक संपूर्ण पीठ असलेल्या करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात दरवर्षी व्हीआयपी दर्शन रांगेवरून वादविवाद होण्याचे प्रकार घडत असतात. त्यामुळे यंदा पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडून श्री अंबाबाई मंदिरात 200 रुपये आकारून दिवसाला एक हजार पेड ई-पास देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. याला विविध हिंदुत्ववादी संघटनांकडून विरोध करण्यात आला. तर, श्रीपूजक गजानन मुनीश्वर यांनी दिवाणी न्यायालयात आव्हान दिले होते. यावर तात्पुरती स्थगिती देत दिवाणी न्यायालयाकडून आज निर्णय देण्यात येणार होता. आज झालेल्या सुनावणीवेळी तिसरे दिवाणी न्यायाधीश के. आर. सिंघल यांनी व्हीआयपी दर्शन रांग आणि पेड ई-पास दर्शनाला परवानगी नाकारली आहे.