अपघाताचा बदला घेण्यासाठी बसस्थानकावरच हल्ला, चारजण गंभीर जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दोन दिवसांपूर्वी एसटी बसच्या धडकेत चुलतभावाचा मृत्यू झाल्याच्या रागातून चुलतभाऊ आणि त्याच्या साथीदारांनी लाठ्याकाठय़ांसह हातकणंगले तालुक्यातील शहापूर एसटी आगारावरच हल्ला केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. मध्यरात्री झालेल्या या हल्ल्यात सुरक्षारक्षक, चालक असे चौघेजण गंभीर जखमी झाले आहेत. तर, 8 एसटी बस व 5 दुचाकींचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी शहापूर पोलिसांत पाचजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुरक्षारक्षक सुरेश केसरकर, वाहक परिट,चालक नवनाथ हिप्परकर, मॅकेनिकल चव्हाण आणि कृष्णा सदाशिव चोपडे (रा. सुळगुड, ता. कागल) अशी जखमींची नावे आहेत. तेजस सातगोंडा कांबळे (रा. विकासनगर), रवि ज्ञानदेव डोंगरे (रा. कृष्ण मंदिर) व अक्षय वडर (रा. जयभीमनगर, सर्व इचलकरंजी) आणि वडर याचे नाव व पत्ता माहीत नसलेले दोन मित्र अशा पाचजणांवर शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एसटीचालक कृष्णा चोपडे यांनी तक्रार दाखल केली आहे.

इचलकरंजी येथील वर्धमान चौकात दोन दिवसांपूर्वी एसटी आणि दुचाकीचा अपघात होऊन दुचाकीवरील तिघे तरुण गंभीर जखमी झाले होते. त्यातील एका तरुणाचा काल दुपारी उपचार सुरू असताना मृत्यू झाला. त्याला एसटीचालकाने धडक देऊन मारल्याच्या रागातून चुलतभाऊ अक्षय वडर आणि त्याच्या मित्रांनी हातात लाठ्याकाठ्या घेऊन मध्यरात्री एक वाजेनंतर शहापूर एसटी आगारात घुसून रात्री मुक्कामाला आलेल्या एसटी बसेसची तोडफोड केली. यावेळी आगारातील सुरक्षारक्षकासह कर्मचाऱयांनाही मारहाण करण्यात आली.

यामध्ये सुरक्षारक्षक सुरेश केसरकर, वाहक परिट, चालक नवनाथ हिप्परकर, मॅकेनिकल चव्हाण आणि तक्रारदार चोपडे हे जखमी झाले आहेत. हल्ला करणाऱयांपैकी दोन तरुणांना पकडून कर्मचाऱयांनी पोलिसांच्या ताब्यात दिले. याबाबत शहापूर पोलीस अधिक तपास करीत आहेत.