हप्ता वसुलीसाठी अश्लील भाषा वापरली, संतप्त महिलांनी कर्मचाऱ्यांना काळे फासत धिंड काढली

1314

हप्ता वसुलीसाठी उद्धट तसेच अश्लील भाषा वापरल्याने संतप्त महिलांनी कोल्हापुरात बजाज फायनान्स कंपनीच्या कार्यालयावरच चाल केली.  खुर्च्यांची तोडफोड करत आक्रमक झालेल्या महिलांनी काही कर्मचाऱ्यांना काळे फासत त्यांची रस्त्यावरून धिंड काढण्याचा प्रयत्न केल्याने वातावरण तंग झाले होते. छत्रपती महिला शासन या संघटनेच्यावतीने हे आंदोलन करण्यात आले. याप्रकरणी शाहुपुरी पोलिस ठाण्यात चार पुरुष आणि पंधरा महिलांविरोधात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्यात येत होता.

घटनास्थळी मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या तीन दिवसापूर्वी नंदवाळ (ता.करवीर) येथील एका महिलेला बजाज फायनान्सच्या एका कर्मचाऱ्याकडून कर्जवसुलीसाठी फोन आला होता. त्या महिलेने पैसे नसल्याचे सांगताच कर्मचाऱ्याने उद्धट व अश्लील भाषा वापरली. त्यामुळे नैराश्य आलेली ती महिला आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात होती.

याप्रकरणी त्या महिलेने छत्रपती शासन या संघटनेला माहिती दिल्यानंतर याचा जाब विचारण्यासाठी आज संतप्त झालेल्या महिलांनी रेल्वे फाटक परिसरात बजाज फायनान्स कंपनीच्या कार्यालयावर चाल केली. कार्यालयात जाऊन संबंधित कर्मचाऱ्याला बोलावून घेण्याची मागणी करत वारंवार फोन करूनसुद्धा कर्मचारी न आल्याने संतप्त झालेल्या महिलांनी अन्य कर्मचाऱ्यांच्या तोंडाला काळे फासले. त्यांची रस्त्यावरून धिंड काढली. त्यामुळे परिसरातील वातावरण काही काळ तणावपूर्ण बनले होते.

आपली प्रतिक्रिया द्या