
वर्षानुवर्षे रखडलेल्या शहराच्या हद्दवाढीसाठी आता पुन्हा एकदा प्रशासकीय आणि जनआंदोलनाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. शिवसेना नेते व नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासाठी सकारात्मकता दर्शविल्यानंतर हद्दवाढ कृती समितीनेही पुन्हा आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. यातूनच हद्दवाढीनंतरच महानगरपालिकेची निवडणूक, घ्या असा आक्रमक सूर काल सायंकाळी झालेल्या बैठकीत निघाला. यावेळी मंत्री एकनाथ शिंदे यांच्या अभिनंदनाचा ठरावही करण्यात आला.
शिवसेना नेते व नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी जिल्हा दौऱयाची सुरुवातच महानगरपालिकेत बैठक घेऊन केली. महापालिकेच्या इतिहासात नगरविकास खात्याचा मंत्री प्रथमच येण्याची ही पहिलीच घटना ठरली. महापालिकेच्या रखडलेल्या कामकाजासह वर्षानुवर्षे रखडलेल्या हद्दवाढीसंदर्भातही त्यांनी आढावा घेतला. हद्दवाढीचा फेरप्रस्ताव देण्याच्या स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या. गावांचाही विचार करून त्यांना विश्वासात घेऊनच ही हद्दवाढ करण्याची ग्वाही मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
दरम्यान, मंत्री एकनाथ शिंदे यांनी शहराच्या हद्दवाढीसंदर्भात उचलेल्या पावलामुळे शहरासह समाविष्ट होणाऱया तीन औद्योगिक वसाहती आणि 42 गावांच्या आजवर रखडलेल्या विकासाला चालना मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. हद्दवाढीचा फेरप्रस्ताव शासनाला पाठविण्यासाठी महापालिका प्रशासकीय स्तरावर हालचाली सुरू झाल्या आहेत. तशाच हालचाली आता जनआंदोलनातूनही दिसून येऊ लागल्या आहेत. यासंदर्भात कोल्हापूर शहर हद्दवाढ कृती समितीची बैठक होऊन, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अभिनंदनाचा ठराव करण्यात आला. तसेच, 2013 च्या प्रस्तावाच्या फायलीवरील धूळ झटकून आठ दिवसांत हद्दवाढीचा फेरप्रस्ताव पाठविण्यासह ‘आता नाही, तर पुन्हा नाही’प्रमाणे व्यापक जनआंदोलनातून जिह्यातील सर्व लोकप्रतिनिधींना यासाठी गळ घालण्याचा प्रयत्न कृती समितीकडून करण्याचा निर्णय घेण्यात आला. हद्दवाढीशिवाय महानगरपालिकेची निवडणूक नको असा सूरही या बैठकीत निघाला.
बैठकीत माजी महापौर मारुतराव कातवरे, किशोर घाटगे, अशोक भंडारे, माणिक मंडलिक, चंद्रकांत बराले, अमर निंबाळकर, सुनील देसाई आदी उपस्थित होते.
प्राधिकरण ठरले निव्वळ बुजगावणे
हद्दवाढ आणि हद्दवाढ विरोधी असे दोन्ही प्रवाह व तशा कृती समितीही स्थापन होऊन संघर्षाची धार निर्माण झाली असतानाच तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जिह्याचे तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्राधीकरण स्थापन केले. यातून हद्दवाढीत येणाऱया गावांची स्वायत्तता तशीच ठेवण्याची ग्वाही दिली होती. प्रत्यक्षात आजतागायत या प्राधिकरणाचा काहीच उपयोग झाला नाही. अधिकाऱयांपासून, कर्मचाऱयांची हाताच्या बोटावर मोजता येणारी संख्या ते ग्रामीण भागातील बांधकाम परवाने नेहमीच वादाचे विषय ठरले. त्यामुळे प्राधिकरण म्हणजे निव्वळ बुजगावणेच ठरले होते.
स्वातंत्र्यानंतर एकदाही हद्दवाढ नाही
राज्यात एकेकाळी सहाव्या क्रमांकावर असलेली कोल्हापूर महानगरपालिका आज 26 व्या स्थानी आहे. महापालिकेच्या इतिहासात तीसुद्धा स्वातंत्र्यापूर्वी केवळ एकदाच हद्दवाढ झाली आहे. त्यानंतर मुंबई, पुणे आदी महापालिकांची तीन-चार वेळा हद्दवाढ झाली, पण तब्बल 42 वर्षे होऊनही कोल्हापूर महापालिकेची एक इंचही हद्दवाढ झाली नाही. त्यामुळे महापालिकेच्या उत्पन्नात वाढ झाली नाही. निकषाच्या वर्गवारीमुळे शासनाकडून मिळणारा भरघोस निधीही मिळत नाही. त्याचाही परिणाम शहराच्या विकासावर झाला आहे. हद्दवाढीच्या मागणीत यापूर्वी जिह्यातील लोकप्रतिनिधींनी राजकीय सोयीसाठी शहर विरुद्ध ग्रामीण असा राजकीय खोडा घातला. त्यामुळे हद्दवाढ होत नव्हती.

























































