लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल होताच कोल्हापुरात पुन्हा मोठी गर्दी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने घेतलेल्या निर्णयानुसार जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून कडकडीत लॉकडाऊन पाळण्यात आला. मात्र, लॉकडाऊन शिथिल होताच आज सकाळी तीन-चार तासांत खरेदीसाठी कोल्हापूरकरांच्या गर्दीने बाजारपेठा फुलून गेल्या होत्या. त्यामुळे पुन्हा एकदा या निष्काळजीपणाच्या गर्दीचा परिणाम किती होईल, या शक्यतेने आरोग्य यंत्रणा चिंताग्रस्त झाली आहे.

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जनतेचेही अर्थचक्र सुरू राहावे यासाठी लॉकडाऊन ऐवजी राज्य शासनाकडून कडक निर्बंध घालण्यात आले. त्यामुळे काही ठिकाणी त्यांचे चांगले परिणाम दिसून आले. तर, काही ठिकाणी नागरिकांची बेफिकिरी अंगलट आल्याचेही दिसून आले.

कोल्हापुरातही रुग्णसंख्या आणि बाधितांचा मृत्यूदर वाढू लागल्याने जिल्ह्यात 14 ते 23 मेपर्यंत कडकडीत लॉकडाऊन पुकारण्यात आला. या काळातही बाधित आणि मृत्यूची संख्या चिंताजनकच राहिली असतानाच लॉकडाऊन शिथिल करण्यात आला. यावेळी पालकमंत्री सतेज पाटील व ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ तसेच जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना विनाकारण बाहेर न पडण्याचे कळकळीचे आवाहन करण्यात आले होते. तरीसुद्धा काही ठिकाणी आज बाजारपेठा गर्दीने फुलून गेल्याचे विदारक चित्र पाहावयास मिळाले.

लक्ष्मीपुरीसह ठिकठिकाणी बाजारपेठेत गर्दीवर पोलीस व महानगरपालिका कर्मचाऱयांना योग्य प्रकारे नियंत्रण ठेवण्यात यश आले. त्यामुळे सकाळी अकरानंतर पुन्हा एकदा सर्व रस्ते निर्जन पडल्याचे दिसून येत होते.