कोल्हापूर – वीस लाखाची लाच घेताना सहाय्यक नगर रचनाकार गणेश माने जाळ्यात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अवसायनातील एका संस्थेच्या जमिनीचे शासकीय मूल्यांकन करून देण्यासाठी तब्बल 45 लाखाची मागणी करून, यातील 20 लाखाचा पहिला हप्ता स्वीकारताना मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमधील मुद्रांक जिल्हाधिकारी सहजिल्हा निबंधक कार्यालयातील सहाय्यक रचनाकार गणेश हनमंत माने (वर्ग 2 अधिकारी) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले. त्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे एका सुतगिरणीचे अध्यक्ष आहेत. ही संस्था शासनाने अवसायनात काढली आहे. त्यामुळे या सुतगिरणीची नोंदणी रद्द करण्यासाठी संस्थेच्या जमिनीचे शासकीय मूल्यांकन करून दाखला देण्यासाठी अवसायकाने मुद्रांक जिल्हाधिकारी यांना पत्र दिले होते. मालमत्तेचे मूल्यांकन लवकर करून दाखला मिळावा म्हणून तक्रारदार सहाय्यक रचनाकार गणेश माने यांना वेळोवेळी भेटले होते. दि 21 जानेवारी 2021 रोजी यासंदर्भात पुन्हा एकदा तक्रारदारने विनंती केली असता,माने यांनी यासाठी 45 लाख रूपये द्यावे लागतील असे सांगितले.त्यामुळे तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार अर्ज दिल्यानंतर पडताळणीत मालमत्तेचे शासकीय मूल्यांकन करून दाखला देण्यासाठी 45 लाख रूपये लाचेची मागणी माने याने करून पहिला हप्ता 20 लाख रूपये घेऊन येण्यास सांगून,उर्वरित 25 लाख रूपये दाखला देताना घेऊन येण्यास सांगितल्याचे निष्पन्न झाले.

आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मध्यवर्ती प्रशासकीय इमारती मधील मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयात सापळा लावला असता,तक्रारदार व गणेश माने हे दोघेजण कार्यालयातून बाहेर पडून आवारातील चहाच्या टपरीवर गेले.तेथे तक्रारदारा कडून 20 लाख रूपये लाच स्वीकारताना पथकाने पकडले. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक अदिनाथ बुधवंत,पो.नि. युवराज सरनोबत,सहा.फौजदार संजू बंबर्गेकर, शरद पोरे,नवनाथ कदम,सुनील घोसाळकर,मयुर देसाई,सुरज अपराध यांच्या पथकाने केली.