कोल्हापुरात संततधार; 58 बंधारे पाण्याखाली, 5 जिल्हा मार्ग बंद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोल्हापूर जिल्ह्यात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसाने दैना उडवली असून, नद्या-नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत. यंदा पहिल्याच पावसात आज दुपारी पंचगंगेचे पाणी प्रथमच पात्राबाहेर पडले. पंचगंगेसह जिल्ह्यातील इतर नद्यांवरील 58 बंधारे पाण्याखाली गेले होते. दिवसभर मुसळधार पावसाचा जोर सुरूच राहिला. जिल्ह्यात गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 187.7 मि.मी. पावसाची नोंद झाली.

कोल्हापूर जिल्ह्यात सर्वत्र संततधार पावसाने हजेरी लावली असून, काल 15 फुटांवर असलेली पंचगंगा नदीची पातळी आज सकाळपर्यंत 10 फुटांनी वाढली. दिवसभरात सायंकाळी सहापर्यंत 10 तासांत 6.9 फुटांची वाढ झाली होती. काल रात्रीच पंचगंगा नदीवरील राजाराम बंधारा पाण्याखाली गेला. पंचगंगेसह जिल्ह्यातील इतर नद्यांवरील 43 बंधारे सकाळी 8 पर्यंत पाण्याखाली गेले होते, तर सायंकाळी सहापर्यंत आणखी 15 बंधारे पाण्याखाली गेले. दिवसभरातील पावसाचा जोर आणि धरणातून आतापासूनच अल्प प्रमाणात सुरू केलेल्या विसर्गामुळे पंचगंगा नदीचे पाणी दुपारनंतर पात्राबाहेर पडले.

गेल्या 24 तासांत सकाळी आठच्या नोंदीनुसार, गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 182.7 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. शाहूवाडी 127.3, राधानगरी 119.2, पन्हाळा 115.1, चंदगड 114.1, कागल 110.1, गडहिंग्लज 100.7, भुदरगड आणि करवीर प्रत्येकी 97, हातकणंगले 89.5, आजरा 85.7 आणि शिरोळ तालुक्यात 73.2 मि.मी.पावसाची नोंद झाली.

58 बंधारे पाण्याखाली; 1 राज्य, 5 जिल्हामार्ग बंद

पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, शिरोळ व तेरवाड, भोगावती नदीवरील राशिवडे व हळदी, तुळशी नदीवरील घुंगुरवाडी, बाचणी, आरे व बीड, दुधगंगा नदीवरील सुळकूड व बाचणी, कासारी नदीवरील यवलूज, कुंभी नदीवरील सांगशी, मांडूकली, शेणवडे व कळे, वारणा नदीवरील चिंचोली व माणगाव, घटप्रभा नदीवरील कानडेसावर्डे, पिळणी, बिजूरभोगोली, अडकूर, कानडेवाडी व तारेवाडी, हिरण्यकेशी नदीवरील साळगाव, ऐनापूर, निलजी, गिजवणे, खाणदळ, जरळी व दाबीळ, तर वेदगंगा नदीवरील निळपण, वाघापूर, गारगोटी, म्हसवे, कुरणी, बस्तवडे, सुरुपली व चिखली असे एकूण 55 बंधारे पाण्याखाली गेले आहेत, तर कोल्हापूर-परिते-गारगोटी-गडहिंग्लज हा राज्यमार्ग आणि 5 प्रमुख जिल्हा मार्ग बंद झाले होते.

राधानगरी धरणातून 841 क्युसेक विसर्ग

आज सकाळी 7 च्या अहवालानुसार, राधानगरी धरणात 65.79 दलघमी पाणीसाठा असून, या धरणाच्या सिंचन विमोचकातून 841 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू होता. याशिवाय, तुळशी 48.84, वारणा 428.20, दुधगंगा 232.45, कासारी 25.74, कडवी 27.39, कुंभी 33.06, पाटगाव 47.34, चिकोत्रा 19.27, चित्री 23.99, जंगमहट्टी 9.95, घटप्रभा 44.17, जांबरे 19.08, आंबेआहोळ 2.61 आणि कोदे (ल.पा.) 2.50 दलघमी असा पाणीसाठा होता. दरम्यान, सातारा येथील कोयना धरणात 31.67 टीएमसी, तर कर्नाटकातील अल्लमट्टी धरणात 25.070 इतका पाणीसाठा होता.

चांदोली धरणात अतिवृष्टी; दीड टीएमसी पाणी वाढले

शिराळा – चांदोली धरण परिसरात अतिवृष्टी झाली आहे. गेल्या 24 तासांत 185 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. पाथरपुंज येथे 329 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. चोवीस तासांत धरणात दीड टीएमसीने पाणी वाढले आहे. गतवर्षी पाटण तालुक्यातील पाथरपुंज येथे चेरापुंजीपेक्षा अधिक पाऊस झाला होता.

इचलकरंजीत पंचगंगेची पातळी बारा फुटाने वाढली

इचलकरंजी येथील पंचगंगा नदीच्या पाण्याची पातळी 58 फूट झाली आहे. एका दिवसात तब्बल बारा फूट पाणी वाढल्याने आपत्ती व्यवस्थापनाचे कर्मचारी नदी तीरावर लक्ष ठेवून आहेत. आज सकाळपासून चार फूट पाणी वाढले. अशीच स्थिती राहिली तर एक-दोन दिवसांत नदीचे पाणी पात्राबाहेर पडेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. इचलकरंजीत अधूनमधून पावसाच्या किरकोळ सरी येत आहेत. संभाव्य पूरस्थिती लक्षात घेऊन नगरपालिकेने संजय कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तैनात केले आहे.