
कोल्हापूर जिल्ह्यात सध्या संभाव्य महापुराची धास्ती कमी झाली असली, तरी सन 2019 आणि 2021च्या महापुरांच्या पार्श्वभूमीवर रेड लाइन, ब्ल्यू लाइनची चर्चा होऊन पूररेषा दर्शविली गेली होती. बांधकामांची नियमावली केली गेली. प्रत्यक्षात आज चित्र वेगळेच आहे. पूररेषेतील बांधकामे आणि भरावाचा परिणाम पुन्हा एकदा दिसून आला आहे. शिवाय रस्त्यांच्या दुतर्फा प्लॅस्टिक पिशव्यांतून टाकण्यात येत असलेला कचरा नद्या-नाल्यांतून वाहून आल्याने पुराच्या पाण्यास पुढे सरकणारा अडथळा याचाही गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात सध्या पावसाचा जोर कमी झाला असून, दीड-दोन आठवडे पात्राबाहेर पसरलेल्या नद्यांचे पाणी पुन्हा पात्रात परतले आहे. महापुराची संभाव्य धास्ती कमी झाली आहे; पण गेल्या आठवडय़ात पंचगंगेने इशारापातळी ओलांडल्यानंतर जिल्हा प्रशासनाकडून पूर येणाऱया भागातील नागरिकांच्या स्थलांतरणावर भर दिला होता. जिल्ह्यातील धरणांतून आणि कोयनेतून विसर्ग सुरू नसताना आणि दरवेळी कोल्हापूर, सांगलीतील महापुरास जबाबदार धरले जाणाऱया कर्नाटकातील अलमट्टी धरणातून विसर्ग सुरू होता. तरीही या काळात पंचगंगेची पातळी इशारापातळीपेक्षाही दीड-दोन फुटांवर आठवडाभर स्थिर राहिली.
यावेळी महापूर येईल, असा बाऊ करण्यात आला; पण पावसाचा जोर कमी झाल्याने महापुराची धास्ती कमी झाली. यावेळी पूररेषेतील नियमबाह्य झालेली बांधकामे, तसेच भराव टाकून करण्यात आलेल्या बांधकामांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले; पण आता त्यावर काहीच चर्चा होताना दिसत नाही.यापूर्वी 2019 आणि 2021च्या महापुरांच्या पार्श्वभूमीवर रेड लाइन, ब्ल्यू लाइनची गांभीर्याने चर्चा झाली, पूररेषा दर्शविली गेली. बांधकामांची नियमावली केली गेली. प्रत्यक्षात मात्र आज चित्र वेगळेच आहे. पूररेषेतील बांधकामे आणि भरावाचा परिणाम आताही दिसून आला. त्यात आता प्लॅस्टिकच्या कचऱ्याचीही मोठी भर पडली आहे. अगोदरच नद्यांचे नाले झाले आहेत. नाले अत्यंत चिंचोळे झाले आहेत. शहरातून वाहणारी जयंती नदी आता शहराचे सांडपाणी वाहून नेणारा नाला बनली आहे. पंचगंगेला मिळताना या नाल्याच्या टोकाला एका बांधकामाची संरक्षक भिंत आहे. शहरातून सांडपाण्यात वाहून येणारा प्लॅस्टिकचा कचरा पाण्याच्या प्रवाहाला अडथळा ठरत आहे. सध्या सर्वत्र कचऱ्यासाठी घंटागाडी धावत असल्या, तरी रस्त्याच्या दुतर्फा प्लॅस्टिक पिशव्यांतून टाकण्यात येणारा कचरा पुरासाठी आणि आरोग्यासाठी धोकादायक बनत आहे.




























































