कोल्हापूर – गणेश विसर्जनासाठी तयार करण्यात आलेली पर्यावरणपूरक यांत्रिक पद्धत राज्यभर चर्चेत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कलानगरी म्हणुन परिचित असलेल्या करवीर नगरीत अनेक कला, गुण, कौशल्यांची कमतरता नसल्याचे आजपर्यंत दिसून आले आहे. यंदा गणेश विसर्जनासाठी ऐनवेळी तयार करण्यात आलेली पर्यावरणपूरक यांत्रिक पद्धत विशेष चर्चैत आली आहे. महानगरपालिकेचे शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत यांनी खास पद्धतीने बनविलेली ही यांत्रिक विसर्जन यंत्रणा चांगलीच यशस्वी ठरली आहे.

जिल्ह्यात यंदा विना मिरवणूक तसेच झगमगाट न करता, साधेपणाने गणेशोत्सव सोहळा साजरा झाला.कोणतीही नदी वा तलावात परंपरेनुसार एकाही मूर्तींचे विसर्जन झाले नाही. दरवर्षी मुर्तींचे विसर्जन करताना येणाऱ्या अडचणी पाहता, शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत यांनी फेब्रिकेटरच्या मदतीने अवघ्या दोन दिवसांत ही यांत्रिक विसर्जन यंत्रणा तयार करुन, इराणी खणीतच याचा थेट वापर करण्यात आला. तब्बल सव्वाशे हुन अधिक गणेश
मूर्तींचे याद्वारे सहज व सुरक्षित विसर्जन करण्यात आले.

साठ फुट लांब आणि 7 टन वजनाचे हे यंत्र असुन, पाण्याच्या मध्यभागी जाऊन सुरक्षितपणे मूर्तीचे विसर्जन करता येते. एका प्लॅटफॉर्मवर दहा ते पंधरा मूर्तीचे अवघ्या तीन मिनिटांत विसर्जन करता येते. विना मनुष्याद्वारेही यातुन विसर्जन करता येते. पहिल्याच प्रयत्नात या यंत्राद्वारे विसर्जन करण्यात यश आले आहे. हे यंत्र तयार करण्यास 40 ते 50 हजार पर्यंत खर्च आला आहे.

विशेष म्हणजे वीज,पेट्रोल-डिझेल अशा कोणत्या ही इंधनाचा यासाठी खर्च नाही. मानवी शक्तीचा यासाठी वापर करण्यात आला आहे. यापुढे या पद्धतीची यांत्रिक यंत्रणा विकसित करण्यात येणार असल्याचे शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत यांनी ‘दैनिक सामना’शी बोलताना सांगितले.