
हातकणंगले तालुक्यातील आळते हद्दीतील हातकणंगले -वडगांव रस्त्यावर असलेल्या निजामीया मदरशामध्ये एका 14 वर्षांच्या मुलाने अकरा वर्षीय फैजान नाजीम ( मुळ राहणार गमहरीय, बिहार ) या मुलाला विजेचा शॉक देऊन त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी हातकणंगले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. मदरशाला सुट्टी मिळावी व तिथून बाहेर पडला यावं म्हणून त्याच मदरशात शिकणाऱ्या वारिस नावाच्या 14 वर्षीय मुलाने फैजानचा खून केल्याचे समोर आले आहे.
घटनास्थळावरून व पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी पहाटे मदरशामध्ये फैजानचा मृतदेह आढळून आला. फैजानच्या अंगावर काही ठिकाणी जखमा देखील होत्या. त्याला हातकणंगले पोलिसांनी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. शवविच्छेदनात फैजान याला विजेचा शॉक देऊन मारल्याचे समोर आलेले. त्यानंतर पोलिसांनी मदरशात जाऊन तपास सुरू केला. तेव्हा वारीस वकील आलम (वय 14, रा. बिहार) या मुलाने, निजामीया मदरशामधून बाहेर पडायचे असल्याच्या कारणावरून, रूम नंबर 2 मध्ये राहणाऱ्या फैजान नाजिम (वय 11) या बालकाला विजेचा शॉक देऊन ठार मारले. ही घटना 15 जून रोजी रात्री 11 च्या दरम्यान घडली. मयत फैजान नाजिम हा मूळचा बिहार मधील अररिया जिल्ह्यातील बगडहारा गावचा रहिवासी होता.
अंगावरील व्रणाने केला खूणाचा उलगडा
फैजान याच्या हातावर व पायावर असलेल्या व्रणांनी मृत्युचे गुढ वाढले त्यानंतर झालेल्या फॉरेन्सिक तपासात मात्र मयत फैजान याला शॉक देऊन जिवंत मारल्याचे समोर आले. ब्लेड , वायर या साहित्याचा वापर करून नियोजनबध्द पध्दतीने वारीस आलमने फैजानला विजेचा शॉक देण्याची व्यवस्था केली होती, शॉक दिल्यानंत फैजान ओरडू नये यासाठी त्याचे तोंड ही बंद केले होते विषेश म्हणजे त्याच खोलीत इतर ही विद्यार्थी झोपले होते मात्र सुदैवाने इतर कुणालाही इजा झाली नाही.