
कोल्हापूर जिल्ह्यात परतीच्या पावसाचा जोर काहीसा थंडावला असला तरी गेल्या दोन दिवसांत झालेल्या ढगफुटीसदृश पावसामुळे शेतीपिकांवर मोठा परिणाम झाला आहे. ऐन सुगीत हातातोंडाशी आलेले भातपीक भुईसपाट झाले आहे. सोयाबीन व भुईमुगाची पिके वाया जाण्याची भीती असून, द्राक्षबागांचेही मोठे नुकसान झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.
परतीच्या पावसामुळे भाजीपाल्यावरही मोठा परिणाम झाला असून, भाज्यांचे दर वाढले आहेत. उसाच्या शेतातही पाणी साचल्याने यंदाचा गळीत हंगाम लांबण्याची चिन्हे दिसून येत आहेत. जिल्ह्यातील पाच हजारहून अधिक हेक्टरवरील पिकांना फटका बसला आहे.
गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याचे दिसून आले. हातकणंगले तालुक्यासह गांधीनगर परिसर तसेच अनेक ठिकाणी ढगफुटीसदृश पाऊस झाला. या परतीच्या पावसाचा सर्वाधिक फटका जिल्ह्यातील शेती व्यवसायावर झाला आहे. ऐन सुगीच्या हंगामात परतीच्या पावसामुळे हातातोंडाशी आलेली पिके झोपल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे. काढणीला आलेल्या सोयाबीन, भुईमूग, उडीद, तीळ, वरी अशा पिकांना आता मोड येऊ लागले आहेत. पावसामुळे जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. शिवाय फ्लॉवर, टोमॅटो, मिरची, कारली, दोडका यासह अन्य भाजीपाला कुजण्याच्या मार्गावर आहे.
सरकारकडून शेतकऱ्यांना मदतीचे काय?
परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक चक्र कोलमडले आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना नुकसान भरपाईबाबत मात्र राज्य सरकारकडून हालचाली होत नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.
जयंती नाल्यातून सांडपाणी थेट पंचगंगेत
गेल्या दोन दिवसांपासून शहराला परतीच्या पावसाने झोडपले. त्यामुळे शहरातील गटार, नाले ओव्हरफ्लो झाले. शहरातील सांडपाणी एकत्रित येऊन जयंती नाल्यातून थेट पंचगंगा नदीत मिसळत होते. हे सांडपाणी थेट मिसळू नये यासाठी सांडपाणी प्रकल्प करण्यात आला. तरीसुद्धा दोन दिवसांच्या पावसामुळे हा नालाच ओव्हरफ्लो झाल्याने प्रक्रियेविनाच फेसाळलेले सांडपाणी थेट पंचगंगा नदीत मिसळत होते.



























































