
जिल्ह्यात गेल्या दोन-तीन दिवसांपासून पावसाचा जोर कमी-अधिक प्रमाणात राहिला. विशेषतः धरण पाणलोटक्षेत्रात पावसाचा जोर अधिक आहे. मुंबई हवामान खात्याने कोल्हापूरला तीन दिवसांचा ‘ऑरेंज अलर्ट’ दिला आहे. धरणांसह नदीच्या पाणीपातळीत इंचाइंचाने वाढ होताना दिसत आहे.
कोल्हापूर जिह्यातील राधानगरी, दूधगंगा (काळम्मावाडी), वारणा आदी लहान-मोठय़ा धरण प्रकल्पांत सध्या 2 टीएमसी पाण्याची वाढ झाली आहे. सकाळपर्यंत 22.97 टीएमसी पाणीसाठा झाला होता. तीन दिवसांपूर्वी 20.77 टीएमसी पाणीसाठा होता. 1 जूनपासून आतापर्यंत जिह्यात सरासरी केवळ 73 मि.मी. व गेल्या 24 तासांत 10 मि.मी. पावसाची नोंद झाली.
राधानगरी धरणाची पाणी साठवणक्षमता 8.361 टीएमसी असून, सध्या 2.12 टीएमसी म्हणजेच 25.37 टक्के पाणीसाठा आहे. दूधगंगा (काळम्मावाडी) धरणात केवळ 1.68 टीएमसी पाणीसाठा असून, 6.62 टक्के पाणीसाठा झाला आहे. तुळशी धरणात 24.18 टक्के, वारणा धरणात 33 टक्के, कासारी धरणात 24.75, कडवी 33.01, कुंभी धरणात 34.52 टक्के, पाटगावमध्ये 25.48 टक्के, चिकोत्रा धरणात 27.64 टक्के पाणीसाठा आहे.
चित्री धरणात 15.94 टक्के, जंगमहट्टीत 22.22 टक्के, घटप्रभात 75.19 टक्के, जांबरेमध्ये 34.52 टक्के, आंबेओहोळमध्ये 31.42 टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याची माहिती पाटबंधारे विभागाकडून मिळाली आहे.
आंबितपाठोपाठ पिंपळगाव खांड धरणही भरले
अकोले तालुक्यातील मुळा पाणलोटक्षेत्रात सुरू असलेल्या पावसाने मुळा नदीवरील आंबितपाठोपाठ आता पिंपळगाव खांड धरण भरले आहे. मुळा नदीतून 2247 क्युसेकने पाणी मुळा धरणाच्या दिशेने जात आहे. आज हे पाणी धरणात दाखल होण्याची शक्यता आहे.
मुळा नदी पाणलोटक्षेत्रात हरिश्चंद्रगड, पाचनई, आंबित परिसरात जोरदार पाऊस सुरू असल्याने मुळेचा प्रवाह कालपासून वाढला आहे. सध्या मुळा धरणात सायंकाळी सहा वाजता 8603 दलघफू पाणीसाठा शिल्लक आहे. मागील वर्षी धरणात या दिवशी 8295 दलघफू पाणीसाठा शिल्लक होता. मुळा धरणाकडे कोतूळ येथून रविवारी सायंकाळी सहा वाजता धरणाकडे 2247 क्युसेक विसर्ग सुरू आहे. कोतूळ येथे 4 मि.मी. पावसाची नोंद झाली. पाऊस होत असल्याने परिसरात शेतीकामांनी वेग घेतला आहे.





























































