
राधानगरी दाजीपूर अभयारण्य क्षेत्रातील तुरंबे-कपिलेश्वर दरम्यान वन्यप्राण्यांची शिकार करण्याच्या हेतूने आलेल्या सातजणांना अटक करण्यात वन विभागाला यश आले आहे. त्यांच्या ताब्यातून शिकारीसाठी लागणारे साहित्य हस्तगत करण्यात आले आहे.
संतोष संभाजी गोसावी, तिमाजी भीमराव गोसावी, चिमाजी भीमराव गोसावी (तिघे रा. परिते), उत्तम राहुल गोसावी, प्रकाश राहुल गोसावी (दोघे रा. राशिवडे), मनोज अर्जुन पवार (रा. शेळेवाडी), दिलीप हिंदुराव गोसावी (रा. भोगावती) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
राधानगरी दाजीपूर वनक्षेत्रातील तुरंबे-कपिलेश्वर भागात शनिवारी (दि. 22) सायंकाळी शिकाऱयांची टोळी आल्याची माहिती वन विभागाला मिळाली होती. त्यांनी या परिसरात सापळा रचून धाड टाकली असता वन्यप्राण्यांच्या शिकारीसाठी आलेले हे 7 शिकारी आढळले. त्यांना अटक करण्यात आली आहे.
सहायक वनसंरक्षक एस. बी. बिराजदार, वनक्षेत्रपाल युवराज पाटील, वनपाल रॉकी देसा, सर्जेराव पाटील, वनरक्षक संदीप शिंदे, राजेंद्र बरगे, पोलीस कॉन्स्टेबल प्रदीप भोसले यांनी ही कारवाई केली.




























































