मनकर्णिका कुंडाचे स्वरूप आठवड्यात स्पष्ट होणार

करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिरातील प्राचीन व गेल्या 60-65 वर्षांपूर्वी बुजविलेला मनकर्णिका कुंड आता पुरातत्व खात्याच्या मार्गदर्शनाखाली खुला होऊ लागला आहे. गेल्या आठ ते नऊ महिन्यांपासून सुमारे आठ मीटरपर्यंत खोदकाम झाले आहे. येत्या आठवडाभरात या प्राचीन कुंडाचे स्वरूप अधिक स्पष्ट होणार आहे, अशी महिती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी शिवसेना शहरप्रमुख व देवस्थान समितीचे सदस्य शिवाजी जाधव, राजेंद्र जाधव, सचिव विजय पवार, आर्किटेक्ट अमरजा निंबाळकर, पुरातत्व खात्याचे उत्तम कांबळे, मूर्ती अभ्यासक उमाकांत राणिंगा, प्रसन्न मालेकर उपस्थित होते.

गेल्या वर्षी 5 जुलैपासून सभोवताली बंदिस्त करून हा कुंड खुला करण्यात येत आहे. कुंडाचा अभ्यास करून मनुष्यबळाचा वापर करीत जुन्या बांधकामास धक्का न लावता खोदाई करण्यात येत आहे. अपेक्षित सहा मीटरपेक्षा जादा खोदाई करावी लागत असून, आतापर्यंत आठ मीटर खोदाई झाली आहे. आणखी चार मीटर खोदाई करावी लागणार आहे. त्यासाठी एक ते दीड महिना कालावधी लागेल. खोदकामात आढळलेल्या काही जुन्या वस्तू, दगडी अवशेष आदींची नोंदणी करून सुरक्षित ठिकाणी ठेवल्या आहेत. कुंड पूर्ववत झाल्यानंतर सापडलेल्या या वस्तू नागरिकांना पाहण्यासाठी खुल्या करणार असल्याचे जाधव यांनी सांगितले.

…तर जनताच त्या पायऱ्या उद्ध्वस्त करतील

मंदिराच्या जागेची शासकीय मोजणी केली असता, यामध्ये कुंडाच्या पश्चिमेस असलेल्या ‘माउली लॉज’ इमारतीच्या जिन्याचे अतिक्रमण असल्याचे आढळले आले. येथील 18 झाडे पालिका प्राधिकरणाच्या परवानगीने काढली आहेत. इतर हार विक्रेत्यांची दुकानेही हलविली आहेत. वारंवार विनंती करूनही संबंधित लॉजमालकाने न्यायालयातून स्थगिती घेतली आहे. वास्तविक या लॉजसंदर्भात पालिकेकडे कसलाही अधिकृत परवाना नाही. त्यामुळे हे अतिक्रमण असताना पालिका प्रशासनाकडून कसलीच कारवाई होत नाही. कुंडाचे खोदकाम पुरातत्व खात्याच्या मार्गदर्शनाखाली गोपनीयरीत्या सुरू असताना बंदिस्तासाठी लावलेले पडदे संबंधित लॉजकडून काढण्यात आले. या खोदकामाचे चित्रीकरणही व्हायरल केले. याप्रकरणी सायबर पोलिसांत तक्रार केली. संबंधित लॉजमालकाने अशीच आडमुठेपणाची भूमिका घेतली तर जनताच त्या पायऱया उद्ध्वस्त करतील, असा इशाराही महेश जाधव यांनी यावेळी दिला.

मंदिराचे होणार ‘थ्रीडी’ स्ट्रक्चरल ऑडिट

हेमाडपंथी बांधकामशैली असलेल्या प्राचीन करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिराच्या बांधकामाचे गुण शोधण्यासाठी लवकरच या मंदिराचे ‘थ्रीडी’ स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात येणार आहे. त्यामुळे मंदिराचा पाया, बांधकामाची वैशिष्टय़े व गुण समोर येतील.

आपली प्रतिक्रिया द्या