
कोल्हापूर जिल्हाधिकाऱयांच्या आदेशानुसार थेट जिह्याबाहेरीलच बदली हमालांना पाचारण करून कोल्हापूर बाजार समितीतील बंद पडलेले गुळाचे सौदे काढण्याची धडक कारवाई करण्यात आल्याने गूळ सौदे अखेर पूर्ववत झाले. नेहमी हमाल दरवाढीवरून अचानक गूळ सौदे बंद करून गूळ उत्पादक शेतकऱयांना वेठीस धरणाऱया बाजार समितीतील हमालवर्गाला यामुळे चाप बसला आहे.
अगोदरच जिह्यातील गुऱहाळघरांची संख्या हजारांवरून आता अवघ्या शंभरच्या घरात आली आहे. त्यात दरवेळच्या हंगामात हमालीच्या दरवाढीवरून गूळ उत्पादक शेतकऱयांना वेठीस धरण्याचा प्रयत्न केला जातो. यंदाही गेल्या दीड महिन्यापूर्वी हमालांनी अचानक गूळ सौदे बंद केल्याने गूळ घेऊन आलेल्या गूळ उत्पादक शेतकऱयांची कोंडी झाली होती. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या आदेशानंतर पोलीस बंदोबस्तात गूळ सौदे पूर्ववत सुरू झाले होते.
सोमवारी पुन्हा हमालांनी अचानक गूळ सौदे बंद करून गूळ उत्पादक शेतकऱयांची कोंडी केली. त्यामुळे मार्केटयार्डमध्ये स्वतः गूळ उतरवून घेत गूळ उत्पादक शेतकरी आक्रमक झाले. याची गांभीर्याने दखल घेत जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी मंगळवारी बैठक बोलाविली. मात्र, या बैठकीतही दरवाढीच्या मुद्दय़ावर हमाल ठाम राहिल्याने जिल्हाधिकाऱयांनी थेट बदली हमाल नेमणुकीचे आदेश दिले. या आदेशानंतर जिह्याबाहेरून हमालांना पाचारण करण्यात आले. यानुसार 60 पुरुष आणि 20 महिला हमालांच्या माध्यमातून बुधवारी पोलीस बंदोबस्तात गूळ सौदे काढण्यात आले. त्यामुळे स्थानिक आणि जिह्याबाहेरून आलेल्या हमालांमध्ये वादाचा प्रसंग निर्माण झाला होता. कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून जिल्हाधिकाऱयांनी जमावबंदीचे आदेश लागू केले होते. बदली हमालांना माथाडी कामगारांकडून धमक्यांचे फोन आल्याने वातावरण तणावपूर्ण बनले होते. याबाबत बदली हमालांनी कोल्हापूर मार्केट कमिटीचे सचिव जयवंत पाटील यांच्याकडे तक्रार केली.
दरम्यान, बदली हमालांना पाचारण करण्यात आल्याने येथील हमालांनाही दोन पावले मागे यावे लागले. त्यांनी विनाअट बंदमधून माघार घेत आजपासून गूळ सौदे पूर्ववत करण्यात आले. दरवाढीसंदर्भात आपली मागणी कायम ठेवत महागाईभत्ता आदी मुद्दय़ांवर निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली पाचजणांच्या समितीकडून निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती राजर्षी शाहू महाराज कृषी उत्पन्न बाजार समितीचे गूळ विभागाचे उपसचिव के. बी. पाटील यांनी सांगितले.
सौद्यात गुळाला 4250 रुपये दर
शुक्रवारी दिवसभरात 5 ते 10 किलोचे 48 हजार 295 गूळरवे आणि 17 हजार 666 बॉक्सची विक्री झाली. गूळरव्यांना तीन हजार 500 ते चार हजार 250 रुपये सौद्यात दर मिळाला. तर, बॉक्सला तीन हजार 300 ते चार हजार 200 रुपये दर मिळाल्याची माहिती बाजार समितीचे उपसचिव व गूळ विभागाचे प्रमुख के. बी. पाटील यांनी दिली.


























































