लिंकवर माहिती भरा, परवानगी घ्या आणि आपल्या गावी जा!

6776

कोरोना संसर्गाच्या पार्श्र्वभूमीवर लॉकडाऊन व संचारबंदीमुळे जिल्ह्याबाहेरचे अडकलेले पर्यटक, विद्यार्थी, यात्रेकरु, प्रवासी, स्थलांतरित कामगार आणि इतर अशा नागरिकांनी आपल्या मुळ जिल्ह्यात जाण्यासाठी महापालिका, नगरपालिका आणि  ग्रामपंचायतींशी संपर्क साधावा. तसेच जिल्हा प्रशासनाने तयार केलेल्या https://bit.ly/Kopentryexit या लिंकवर आपली माहिती भरावी, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केले.

लॉकडाऊनमुळे जिल्ह्यामध्ये स्थलांतरित कामगार, विद्यार्थी, पर्यटक, यात्रेकरु, प्रवासी आणि इतर नागरिक अडकले आहेत. अशा व्यक्तींना आपापल्या जिल्ह्यांमध्ये तसेच राज्यामध्ये जाण्यासाठी शासनाने धोरण निश्चित केले आहे. त्यानुसार कोल्हापूर जिल्ह्यामधून बाहेर जाणाऱ्या व्यक्तींसाठी यादी करण्याची प्रक्रिया महापालिका, नगरपालिका आणि ग्रामपंचायत स्तरावर सुरु आहे. अशा ठिकाणी संबंधितांनी संपर्क साधावा. या ठिकाणी तयार झालेली यादी जिल्हा प्रशासनाकडून संबंधित जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे मान्यतेसाठी पाठविण्यात येईल. त्यांच्याकडून परवानगी आलेल्यांनाच त्यांच्या-त्यांच्या जिल्ह्यात, राज्यात जाण्यास परवानगी देण्यात येईल.अशा व्यक्ती स्वत:च्या वाहनाने तसेच भाड्याच्या वाहनाने जावू शकतील.

याच पद्धतीने कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिक इतर जिल्ह्यात, राज्यात अडकलेले असतील अशांसाठी त्या-त्या जिल्ह्यात, राज्यात यादी तयार करण्याचे काम तेथील जिल्हाधिकाऱ्यांचे आहे. ही यादी कोल्हापूर जिल्हा प्रशासनाकडे मान्यतेसाठी पाठविण्यात येईल. मान्यता मिळाल्यानंतर अशा व्यक्तींना येण्यास परवानगी मिळेल. या दोन्ही पद्धतीमध्ये त्या-त्या नागरिकांची त्या-त्या जिल्ह्यात वैद्यकीय तपासणी करण्यात येईल. वैद्यकीयदृष्ट्या सक्षम असल्यास त्याला जाण्यास अनुमती देण्यात येईल. कोरोनाशी संबंधित काही लक्षणे असल्यास त्याच्यावर त्याच ठिकाणी उपचार करण्यात येतील असेही जिल्हाधिकारी देसाई यांनी सांगितले.

यासाठी कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने https://bit.ly/Kopentryexit ही लिंक तयार केली आहे. यावर नागरिकांनी माहिती भरावी. तसेच जिल्हा प्रशासनाने प्रसिद्ध केलेल्या 9356716563, 9356732728, 9356713330, 9356750039 आणि 9356716300 या पाच व्हाट्सॲप क्रमांकावर संपर्क साधावा. यावरही आपल्याला लिंक मिळेल. त्याच प्रमाणे जिल्हा प्रशासनाच्या 1077 या टोल फ्री क्रमांकावर आणि  0231-2659232, 2652950,2652953-54 या क्रमांकावरही संपर्क साधण्याचे आवाहनही जिल्हाधिकारी देसाई यांनी केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या