95 कोटींच्या मागणीसह 366 कोटींच्या प्रस्तावाचा ठराव मंजूर, कोल्हापूर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत निर्णय

शासनाकडे केलेली अतिरिक्त 95 कोटींच्या मागणीसह 366 कोटी प्रस्तावाच्या ठरावास आज जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. सर्व विभागांनी दिलेला निधी शंभर टक्के खर्च करावा त्यानुसारच पुढील वर्षाचा निधी दिला जाईल, अशा स्पष्ट सूचना पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री सतेज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली. यावेळी सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, जिल्हा परिषद अध्यक्ष बंजरंग पाटील, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, खासदार प्रा. संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने, आमदार प्रकाश आबीटकर, आमदार चंद्रकांत जाधव, आमदार ऋतुराज पाटील, आमदार राजू आवळे, आमदार प्रकाश आवाडे, जयंत आसगावकर, राजेश पाटील, जिल्हाधिकारी दौलत देसाई, मनपा आयुक्त कादंबरी बलवकडे, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, सिईओ संजयसिंह चव्हाण आदी उपस्थित होते.

इचलकरंजी, कोल्हापूर लक्ष्मीपुरीतील पोलीसांच्या निवासस्थानाबाबत नुकत्याच झालेल्या बैठकीत तत्त्वतः मान्यता दिली आहे. जिल्हा नियोजन मधून त्यासाठी निधी देण्यात येणार आहे. जिह्यातील 31 पैकी 15 पोलीस ठाण्यांना अत्याधुनिक करण्यासाठी प्रत्येकी 15 लाखांचा निधी दिला आहे. चंदगड येथील जुने तहसील कार्यालय पोलीस ठाण्यासाठी देण्याचा निर्णय घेतला जाईल, अशी माहिती सतेज पाटील यांनी दिली.

ग्रामपंचायतीमधील पथदिवे सुरू करण्यास संबंधित विभागाने एकत्रित मार्ग काढावा, तसेच कोरोनाकाळात काम केलेल्या कंत्राटी कर्मचाऱयांना शासन सेवेत घेण्याबाबत प्राधान्य द्यावे, याबाबत शासनाला कळविले जाईल, असेही पालकमंत्री पाटील म्हणाले.

‘क’वर्ग यात्रा स्थळांना मान्यता

पन्हाळा तालुक्यातील बहिरेवाडी, दिगवडे, कोदवडे. शाहूवाडी तालुक्यातील सावे, कासार्डे, बुरंबाळ, चरण, अनुस्कुरा, अमेणी, कोपार्डे, शिवारे, पाटणे, शाहूवाडी, तुरकवाडी, परखंदळे, शिराळे तर्फ मलकापूर, उखळू, भेडसगाव, नेर्ले. शिरोळ तालुक्यातील हेरवाड. हातकणंगले तालुक्यातील मिणचे, मागणाव. गगनबावडा तालुक्यातील आणदूर, करवीर तालुक्यातील धोंडेवाडी, वसगडे, कळंबे तर्फ कळे येथील यात्रा स्थळांना आजच्या बैठकीत ‘क’ वर्ग मान्यता देण्यात आली.

आपली प्रतिक्रिया द्या