कोल्हापूर, नगरमधील महाविद्यालये गजबजली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना संसर्गाचा जोर कमी झाल्याने शाळांपाठोपाठ राज्यातील वरिष्ठ महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता. त्यानुसार तब्बल दीड वर्षानंतर आज सकाळपासून कोल्हापूर आणि नगर जिह्यातील महाविद्यालयांचा परिसर पुन्हा गजबजून गेला. कोविड प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतलेल्या विद्यार्थ्यांनाच महाविद्यालयात प्रवेश देण्यात येत असल्याने केवळ द्वितीय व तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांची हजेरी दिसून आली.

कोल्हापुरात सकाळच्या सत्रात कला व वाणिज्य तर दुपारच्या सत्रात शास्त्र शाखेची महाविद्यालये 50 टक्के हजेरीच्या क्षमतेवर सुरू झाली. राज्य सरकारने केलेली नियमावली व त्या नियमांचे पालन करूनच महाविद्यालयात विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात होता. काही महाविद्यालयांत गुलाबपुष्प देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. कोराना लसीचे प्रमाणपत्र पाहून महाविद्यालयात प्रवेश देण्यात येत होता.

ऑफलाइन तसेच ऑनलाइनद्वारे वरिष्ठ महाविद्यालये सुरू झाली. महाविद्यालय रितसर सुरू होणार असल्याने प्राध्यापकांकडून अध्यापनाचे काम सुरू झाले आहे. त्यात शिवाजी विद्यापीठाचा द्वितीय वर्षाचा निकाल नुकताच लागल्याने काही महाविद्यालयात तृतीय वर्षाचे विद्यार्थी उपस्थित राहू शकले नाहीत. पण प्रवेशाच्या माहितीसाठी महाविद्यालयात विद्यार्थ्यांची गर्दी दिसून आली. दरम्यान, काही महाविद्यालयांत एक दिवस मुले तर एक दिवस मुलींसाठी वर्ग सुरू ठेवण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे.

नगर जिह्यात सुमारे शंभर ते दीडशे महाविद्यालये आहेत. यातील बहुतांश महाविद्यालये आज सुरू झाली आहेत. महाविद्यालयांकडून वर्गखोल्या, प्रयोगशाळा तसेच ग्रंथालयाचे निर्जंतुकीकरण करण्यात आले. आज सकाळी मोठय़ा उत्साही वातावरणात ही महाविद्यालये सुरू झाली. दीड महिन्यापासून सुना असलेला कॉलेज कट्टा पुन्हा गजबजला आहे. शिक्षक-विद्यार्थ्यांचे लसीकरण तसेच कोरोना मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याचे आदेश विद्यापीठाकडून देण्यात आलेले आहेत. त्याची अंमलबजावणी महाविद्यालयांकडून करण्यात येत आहे.

सोलापुरातील 111 महाविद्यालये सुरू

सोलापूर जिह्यातील 111 महाविद्यालये आजपासून सुरू झाली आहेत. कोरोना लसीचे कारण देत पहिल्याच दिवशी अवघे 25 टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती असल्याचे दिसून आले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ संलग्नित जिह्यात 111 महाविद्यालये आहेत. जवळपास 83 हजार विद्यार्थी असून, आज यातील 25 टक्के विद्यार्थ्यांचीच उपस्थिती होती. गुलाबपुष्प देऊन तर काही ठिकाणी वाद्ये वाजवून विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात येत होते.