
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा प्रथमच शारदीय नवरात्रौत्सव लोकसहभाग आणि भक्तांविना केवळ मानक-यांच्या उपस्थितीत परंपरेनुसार संपन्न झाला.या नवरात्रोत्सवात करवीरनिवासिनी श्रीअंबाबाई मंदिर बंद असले तरी भाविकांनी देवीला ७ लाख ६८ हजार ४८६ रुपयांचे सोने चांदी दागिने अर्पण केले आहे. तसेच ११ लाख २७ हजार ७१९ पर्यंत रक्कम ऑनलाईनद्वारे अर्पण केल्याची माहिती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेश जाधव व सचिव विजय पोवार यांनी दिली.
शारदीय नवरात्रौत्सवाच्या काळात दरवर्षी देवस्थानला सुमारे २ कोटींचे उत्पन्न मिळते. पण कोरोनामुळे गेल्या सहा महिन्यांत सुमारे १० कोटींचे उत्पन्न घटले आहे.
यंदा नवरात्रोत्सवात ही मंदिरे बंद राहिली असली तरी भाविकांनी देवीला ठुशी, सोन्याची माळ, पेंडल, मंगळसूत्र या प्रकारचे १४० ग्रॅम ५५० मिलीचे सोन्या-चांदिचे दागिने अर्पण केले आहेत. त्यांची बाजारभावानुसार ७ लाख ६८ हजार ४८६ रुपये किंमत होते.
नवरात्रीत ८७ लाख ७३ हजार २१६ भाविकांनी घेतले श्रीअंबाबाईचे दर्शन
यंदा नवरात्रोत्सवात भाविकांसाठी मंदिर बंद असले तरी करवीरनिवासिनी श्रीअंबाबाईचे या नऊ दिवसांत तब्बल ८७ लाख ७३ हजार २१६ भाविकांनी ऑनलाईन दर्शनाचा लाभ घेतला. पहिल्या दिवशी १३ लाख ९९ हजार ८९२ भाविकांनी दर्शन घेतले. तर नऊ दिवसांत सरासरी ८ लाख १९ हजार २५८ पेक्षा अधिक भाविकांनी दररोज दर्शन घेतले आहे.
फेसबुकच्या माध्यमातून ८० हजारपेक्षा अधिक, युट्युब ६० हजारपेक्षा अधिक, तर इन्स्टाग्राम आणि ट्विटर द्वारे प्रत्येकी २० हजार पेक्षा अधिक भाविकांनी दररोज दर्शनाचा लाभ घेतला आहे.

























































