
भुदरगड तालुक्यातील काँग्रेस पक्षाचे ओबीसी सेलचे पदाधिकारी तसेच पाटगावचे माजी सरपंच महेश दिनकर पिळणकर (52) हे गेल्या दोन महिन्यांपासून बेपत्ता आहेत. पोलिसांत तक्रार दाखल करुनही अद्याप त्यांचा शोध लागलेला नाही. बेपत्ता झाल्यानंतर दोन-तीन दिवसांतच जंगलात जळालेल्या अवस्थेतील मानवी हाडांचे अवशेष पोलिसांना सापडले असले तरी त्याबाबतही पोलिसांकडून ठोस तपास झालेला नाही. त्यामुळे पाटगावच्या सरपंचाचे नेमके काय झाले? असा सवाल उपस्थित होत आहे. दरम्यान, गेल्या वर्षी बीड जिह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत निर्घृण हत्या झाली होती. या हत्या प्रकरणाची पाटगावमध्ये पुर्नरावृत्ती झाली का? अशी भिती व्यक्त होत आहे.
महेश पिळणकर बेपत्ता प्रकरणातील तपासास गती देताना, फॉरेन्सिक पुराव्यांची पुनर्तपासणी व आधुनिक तांत्रिक तपास पद्धतींचा अवलंब करण्याबाबत कुटुंबियांकडून जिल्हा पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांना आज निवेदन देण्यात आले. 7 जानेवारी 2026 रोजी महेश हे घरी आईला मित्रांकडे जेवायला जातो असे सांगून मोटरसायकलवरून घरातून बाहेर पडले. पण त्यानंतर ते घरी आलेले नाहीत. कोणताच संपर्क न झाल्याने 8 जानेवारी रोजी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तर कुटुंबियांना 9 जानेवारी रोजी त्यांचे वाहन मिळून आले. तर 11 जानेवारी रोजी वाहनापासून काही अंतरावर जंगलात काही मानवी अवशेष जळालेल्या अवस्थेत मिळून आले.
पोलिसांनी तपासासाठी ते अवशेष ताब्यात घेतले. त्याबाबत ठोस माहिती मिळत नाही. पोलिसांकडून कोणतेही अवशेष शिल्लक नसल्याचे सांगितले जात असल्याचा आरोप कुटुंबीयांकडून करण्यात आला आहे.
जनआंदोलनाचा इशारा
महेश पिळणकर हे संशयास्पद परिस्थितीत बेपत्ता असून, या घटनेला दोन महिन्यांहून अधिक कालावधी उलटून गेला असतानाही तपासातून अद्याप कोणतीही ठोस प्रगती झालेली दिसत नाही. या पार्श्वभूमीवर लोकशाही व संविधान हक्क संघर्ष समिती, कोल्हापूर जिल्हा यांच्या वतीने दसरा चौक येथे तीव्र निदर्शने करण्यात आली. तसेच जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊन तपासाला तातडीने गती देण्याची मागणी करण्यात आली आहे.




























































