Kolhapur News चैनीसाठी दागिन्यांचा मोह; नातवाकडून आजीचा खून; चहातून प्यायला दिली विषारी पावडर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चैनीसाठी आजीच्या अंगावरील सोन्याच्या दागिन्यांच्या मोहापायी नातवाने एकटय़ा राहणाऱया आजीलाच चहातून विषारी पावडर खायला घालून तिचा खून केल्याची घटना पोलिसांनी उघडकीस आणली आहे. याप्रकरणी पोलिसांनी नातवाला अटक केली आहे.

उषा मारुती भिऊंगडे (वय 72, रा. गंगावेश) असे खून झालेल्या आजीचे नाव आहे. प्रेम परशराम भिऊंगडे (वय 20, रा. फुलेवाडी) असे अटक केलेल्या नातवाचे नाव आहे.

उषा भिऊंगडे या वृद्धेचा गंगावेश परिसरातील राहत्या घरात सोमवारी (16 रोजी) संशयास्पद मृतदेह सापडला होता. लक्ष्मीपुरी पोलिसांनी पंचनामा केला तेव्हा त्यांच्या अंगावरील दागिने गायब झाल्याचे लक्षात आले होते. पोलिसांनी मृतदेह सीपीआर रुग्णालयात पाठविला तेव्हा वैद्यकीय तपासणीत तिचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. मात्र, संशयावरून पोलिसांनी व्हिसेरा राखून ठेवला होता.

पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांच्या सूचनेनुसार पोलिसांनी अधिक तपास केला असता, उषा भिऊंगडे यांच्या घरात सकाळी 8.30च्या सुमारास त्यांचा नातू प्रेम येऊन गेल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी प्रेम याला ताब्यात घेऊन चौकशी केली, तेव्हा त्याने सोन्याचे दागिने काढून घेण्यासाठी आजीच्या चहात विषारी द्रवपदार्थ (मोरचूद) टाकल्याची, तसेच त्या बेशुद्ध झाल्यानंतर हातातील सहा पाटल्या, गळ्यातीन दोन चेन, कानातील सोन्याची फुले असे 10 तोळ्यांचे दागिने घेऊन पलायन केल्याची कबुली दिली. कोणताही ठोस पुरावा हातात नसताना आणि हृदयविकारामुळे मृत्यू झाल्याचा वैद्यकीय अहवाल असतानाही पोलिसांनी तीन ते चार दिवस कसून तपास करीत संशयित नातू प्रेम भिंगडे यास अटक केली.

प्रेम हा शहरातील एका महाविद्यालयात बी.ए.च्या तिसऱया वर्षात शिकत आहे. तसेच तो पारंपरिक सोन्या-चांदीचे दागिने पॉलिश करण्याचे काम करीत होता. त्याला चैन करण्याची सवय होती. पैसे कमी पडत असल्यानेच त्याने आजीचे दागिने चोरण्याचा प्लॅन केला. आजी सहजासहजी दागिने देणार नसल्याचे लक्षात आल्यानंतर तिचा खून करून दागिने काढून घेतल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.