
आपल्या वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्र्यांच्या फोटोसह एका कुख्यात गुंडांकडून शुभेच्छाफलकांचे जाहीर प्रदर्शन करून दहशतीचे वातावरण निर्माण करू पाहणारे मिंधे गटाचे माजी आमदार व राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांचा आता शस्त्र्ा नियमभंगाचा प्रकार समोर आला आहे. सार्वजनिक ठिकाणी चक्क तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा केल्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी शिवसेनेचे शहरप्रमुख रविकिरण इंगवले यांनी केली असून, त्यांनी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला आहे.
राजेश क्षीरसागर यांनी गुरुवारी सायंकाळी आपल्या निवासस्थानाशेजारील सार्वजनिक रस्त्यावर आपला वाढदिवस साजरा करताना चक्क तलवारीने केक कापला. याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियातून व्हायरल झाले. आजपर्यंत जिह्यात अनेक गुंडांनी रात्री-अपरात्री चाकू तसेच तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा करण्याचा प्रयत्न केला होता. त्यांच्यावर पोलिसांकडून गुन्हे दाखल करण्यात आले. मात्र, क्षीरसागर यांच्या बाबतीत राजकीय दबावामुळे पोलिसांचे दुर्लक्ष पाहून शिवसेना शहरप्रमुख रविकिरण इंगवले यांनी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात क्षीरसागर यांच्याविरोधात तक्रार अर्ज दिला. यामध्ये सार्वजनिक ठिकाणी क्षीरसागर यांनी शस्त्र्ाभंग कायद्याचे उल्लंघन केल्याचे म्हटले आहे. तसेच, काही वादग्रस्त फलक लावून शहर विद्रुपीकरण नियमाचेही उल्लंघन केल्याची तक्रार केली आहे.
दरम्यान, जिल्ह्यात यापुर्वीही तरुणांकडून तलवारीने केक कापल्याचे प्रकार घडले होते. संबंधितांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले होते. त्यावेळी ‘असे प्रकार घडत असतील, तर त्या त्या हद्दीतील पोलीस अधिकारी संबंधितांवर गुन्हे दाखल करतील’, असे पोलीस अधिक्षक शैलेश बलकवडे यांनी सांगितले होते. त्यामुळे या प्रकरणावर पोलिसांच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे.
पालकमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांचीही उपस्थिती
राजेश क्षीरसागर यांचा सार्वजनिक ठिकाणी वाढदिवस साजरा करताना पालकमंत्री दीपक केसरकर यांच्यासह जिल्हा न्यायदंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी राहुल रेखावर हे जबाबदार लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. त्यांच्यासमोरच तलवारीने क्षीरसागर यांनी केक कापल्याचे व्हिडीओ तसेच फोटोतून दिसत आहे. त्यामुळे क्षीरसागर यांच्यावर कारवाई होणार काय, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.


























































