
हातकणंगले तालुक्यातील पेठवडगाव नगरपरिषद निवडणूक स्ट्राँगरूम परिसरात घरांवर लावलेले खासगी सीसीटीव्ही कॅमेरे निवडणूक आयोगाच्या आदेशाने प्रशासनाने हटविले. यानंतर यादव गटाच्या कार्यकर्त्यांनी स्ट्राँग रूमसमोर आंदोलन करत निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला. अखेर सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी सुमित जाधव यांनी उमेदवार वा त्यांच्या प्रतिनिधींना 24 तासांत स्ट्राँग रूममध्ये पाहण्यासाठी हरकत नसल्याचे सांगितल्यानंतर तणाव निवळला.
पेठवडगाव नगरपरिषदेच्या निवडणुकीतील मतपेटय़ा ठेवण्यासाठी छत्रपती शिवाजी चौक परिसरातील मराठा मंडळाची इमारत स्ट्राँग रूम म्हणून वापरण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने स्ट्राँग रूमच्या आतील बाजूस सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले आहेत, पण बाहेर क्रीन लावलेली नाही. त्यामुळे स्ट्राँग रूम परिसरातील दोन-तीन घरांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवले होते. यातून स्ट्राँग रूमवर टेहळणी होत असल्याची तक्रार आल्यानंतर आयोगाने हे कॅमेरे काढण्यासाठी कर्मचाऱयांची नियुक्ती केली होती.
आज दुपारी कर्मचाऱयांनी संबंधित घरावरील खासगी कॅमेरे पोलीस बंदोबस्तात काढून घेतले. याची माहिती मिळताच यादव आघाडीच्या कार्यकर्त्यांनी स्ट्राँग रूम परिसरात ठिय्या मारला. यावेळी कार्यकर्ते आणि सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी सुमित जाधव यांच्यात वादावादी झाली. यावेळी कार्यकर्त्यांनी खासगी घरावरील कॅमेरे काढणे म्हणजे हे अधिकारावर गदा आणण्याचा प्रकार असल्याचे सांगितले. स्ट्राँग रूमच्या पारदर्शकतेबाबत संशय व्यक्त होत असून, बाहेर क्रीन लावावी, अशी मागणी केली. अखेर उमेदवार वा त्यांचे प्रतिनिधींना स्ट्राँग रूममध्ये पाहणी करण्याचा 24 तास अधिकार आहे, त्यास आम्ही हरकत घेत नाही, असे सांगितल्याने वातावरण निवळले.


























































