
कोरोनामुळे बंद असलेल्या शाळा आता आठ महिन्यानंतर येत्या सोमवारपासून सुरु होत आहेत. राज्य शासनाच्या सुचनेनुसार प्रथम नववी ते बारावी पर्यंतच्या शाळा सुरू करण्याच्यादृष्टीने महापालिका प्रशासनाने तयारी केली आहे.
आतापर्यंत शहरातील 370 शिक्षकांची तपासणी तर 65 शाळांचे निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. उर्वरित शिक्षकांची तपासणी, शाळांचे निर्जंतुकीकरण व स्वच्छतेचे काम युध्दपातळीवर हाती घेण्यात आल्याची माहिती महापालिकेच्या प्रशासक तथा आयुक्त कादंबरी बलकवडे यांनी दिली.
सोमवार 23 नोव्हेंबर 2020 पासून 9 वी ते 12 वी पर्यंतच्या शाळा सुरु करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. यासंबंधी राज्य शासनाने केलेल्या सूचनेनुसार, शहरातील 112 शाळा सुरू करण्यात येणार आहेत. या शाळांमधील 1 हजार 195 शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचीही कोरोनाच्या अनुषंगाने आरटीपीसीआर तपासणी करण्यात येत आहे.
महापालिकेच्या शहरातील 11 नागरी आरोग्य केंद्रे, आयसोलेशन हॉस्पिटलसह 12 ठिकाणी कोरोना चाचणीची मोफत सुविधा उपलब्ध केली आहे. 22 नोव्हेंबर 2020 पर्यंत या सर्व शिक्षकांची चाचणी पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच या सर्व शाळा, परिसराचे शंभर टक्के निर्जंतुकीकरण आणि स्वच्छतेचे कामही गतीने सुरु आहे. या कामाची जबाबदारी प्रशासन अधिकारी शंकर यादव यांच्यावर सोपविण्यात आली आहे. तर अतिरिक्त आयुक्त नितिन देसाई यांच्या अध्यक्षतेखाली शहरस्तरीय शालेय आपत्कालीन समितीही गठीत करण्यात आल्याची माहिती महानगरपालिका प्रशासक तथा आयुक्त कादंबरी बलकवडे यांनी दिली.

शाळेत हात धुण्यासाठी सुविधा उपलब्ध करुन देणे, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची कोव्हिड 19 चाचणी करणे, वर्गनिहाय पालक समितीची बैठक घेणे, शाळेच्या अंतर्गत व बाहय परिसरात किमान 6 फूट शारीरिक अंतर ठेवणे,यासाठी चौकोन वा वर्तुळ तयार करणे, सर्व विद्यार्थी, शिक्षक व कर्मचाऱ्यांनी कायम मास्कचा वापर करण्यासह त्यांची दररोज ऑक्सिजन व तापाची चाचणी करणे बंधनकारक केले आहे. तसेच विद्यार्थी वाहतुकीच्या वाहनांचे रोज निर्जंतुकीकरण करण्याच्या सूचनाही शिक्षण विभागास दिल्या असल्याचेही कादंबरी बलकवडे यांनी सांगितले.
शिक्षण विभागामार्फत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर
प्रशासन अधिकाऱ्यांनी सर्व मुख्याद्यापकांना व्हीसीव्दारे मार्गदर्शन केले असून मुख्याद्यापक तसेच प्राचार्य स्तरावर शाळा सुरु करण्यासाठी कार्यवाही गतीने सुरू केली आहे. पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी घ्यावयाची काळजी व खबरदारीची माहिती देण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. वर्गखोली तसेच स्टाफरुममधील बैठक व्यवस्था शारीरिक अंतराच्या नियमांनुसार करण्यात येत आहे. तसेच वर्गामध्ये एका बाकावर एक विद्यार्थी याप्रमाणे नावानिशी बैठक व्यवस्था करण्याचे निर्देशही संबंधितांना देण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांची शाळेतील उपस्थिती बंधनकारक नसून पूर्णत: पालकांच्या संमतीवर अवलंबून असणार आहे. पालकांनी योग्य दक्षता घेवून न घाबरता मुलांना शाळेत पाठवावे असे आवाहन बलकवडे यांनी केले आहे.






























































