
शिवाजी विद्यापीठात सादर होणारे प्रबंध आणि संशोधन पेपर आता संशयाच्या भोवऱयात सापडले आहेत. आतापर्यंत सादर केलेले काही प्रबंध आणि संशोधन पेपरमध्ये अनेक तफावती असल्याची बाब संशोधक राजवर्धन कापशीकर यांनी आज पत्रकार परिषदेत चव्हाटय़ावर आणली.
आतापर्यंत वीस ते बावीस अशी प्रबंधांची प्रकरणे चुकीच्या पद्धतीने सादर करण्यात आली असून, त्यांना संबंधित विभागप्रमुखांनी मान्यता देणे गंभीर चूक असल्याचा दावाही कापशीकर यांनी केला आहे. शिवाजी विद्यापीठात सादर करण्यात आलेले 8 ते 9 रिसर्च पेपर हे इतर ठिकाणी पूर्ण झालेले असून, ते यापूर्वीच विविध जर्नलमध्ये प्रकाशित झालेले आहेत. यावरून ते कॉपी-पेस्ट करून सादर केल्याचा आरोप राजवर्धन कापशीकर यांनी केला. यातील कॅन्सर तसेच घाणेरी वनस्पती संदर्भातील संशोधन पेपरमधील तफावत निदर्शनास आणून दिले.
संशोधनासाठी शासन मोठय़ा प्रमाणात निधी देत आहे. पण चुकीच्या पद्धतीने अशी सादर होणारी आणि त्यांना मान्यता देण्याचा प्रकार चुकीचा असल्याने याला आळा बसावा, यासाठी शिवाजी विद्यापीठात निवेदनही दिले आहे. तरी याची गांभीर्याने दखल विद्यापीठाने घेतली नसल्याचे कापशीकर म्हणाले.





























































