
मुंबई आणि सोलापूर वरून कोल्हापूरात आलेल्या चौघांना कोरोनाची लागण झाल्याचे आज सकाळी स्पष्ट झाले. सोलापुरहुन येथे आलेल्या 23 वर्षीय डॉक्टर तरुणीसह शाहुवाडीतील 22 वर्षाचा तरुण, भुदरगड तालुक्यातील 32 वर्षाचा तरुण तर आजरा तालुक्यातील 49 वर्षाच्या पुरुषाचा यामध्ये समावेश आहे.
आकुर्डी (ता.भुदरगड), कोल्हापूर शहरात, कनान नगर झोपडपट्टीतील तरुण आणि कंटेनरमध्ये आढळलेला पुरुष असे तिघेजण कोरोनामुक्त झाल्याने, काल सायंकाळी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता. त्यामुळे समाधानाचे वातावरण असतानाच, रविवारी नव्याने चार रुग्ण आढळल्याने, जिल्ह्यात कोरोनाबाधीतांची संख्या 40 वर गेली आहे. आतापर्यंत 13 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून, इचलकरंजी येथील एका वृद्धाचा मृत्यू झाला आहे.
मुंबई, पुणे, सोलापूर आदी रेडझोन मधुन कोल्हापूरात येणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना, गेल्या शनिवारीपासुन कोरोनाची ही येथे संख्या वाढत आहे. काल शनिवारी एकाच दिवशी सात जण कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले. यातील पाच जण मुंबई तर दोघेजण सोलापूर जिल्ह्यातुन आले आहेत. तर आज सकाळी नव्याने चौघांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. हे सर्वजण 13 मे आणि 15 मे रोजी सीपीआरमध्ये दाखल असल्याची माहिती मिळाली.
मरकजला केलेले 24 जण परतले
मरकज, दिल्लीत धार्मिक कार्यक्रमासाठी गेलेले आणि लॉकडाऊनमुळे अडकलेले जिल्ह्यातील 24 जण आज रविवारी कोल्हापुरात परतले आहेत. जिल्हा प्रशासनाकडून त्या सर्वांना पुलाची शिरोलीत क्वारंटाईन करण्यात आले आहे. या सर्वांचे स्वब घेण्यात आले असून, खबरदारीसाठी त्यांच्यावर सीपीआरच्या वैद्यकीय पथकाचे विशेष लक्ष ठेवण्यात आले आहे.






























































