ढगांच्या लपाछपीत कोल्हापूरकरांनी साधली सूर्यग्रहण याची देही याची डोळा पाहण्याची पर्वणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ढगाळ वातावरणात ढगांच्या लपाछपीतही आज कोल्हापुरकरांनी खंडग्रास पध्दतीचे सूर्यग्रहण याची देही याची डोळा पाहण्याची पर्वणी साधली. जेव्हा चंद्र, सूर्य व पृथ्वीच्यामध्ये येतो तेव्हा पृथ्वीवर चंद्राची सावली पडते. या सावलीतून दिसणा-या स्थितीला सूर्यग्रहण म्हणतात. जेव्हा सूर्याचा काही भागच चंद्राच्या मागे जातो तेव्हा दिसणा-या स्थितीला खंडग्रास सूर्यग्रहण म्हणतात. आज रविवारी या वर्षांतील पहिले खंडग्रास सूर्यग्रहण महाराष्ट्रात पाहायला मिळाले.

सकाळी १० वाजून ३ मिनिटांनी या सुर्य ग्रहणास सुरूवात झाली.तर ११ वाजून ३९ मिनिटांनी ढगांच्या लपाछपीत सूर्यग्रहणाचे दर्शन झाले. साडेबारा ते सव्वा एकपर्यंत ढगांची लपाछपी सुरू होती. सूर्यग्रहण सुटतानाच ढग बाजूला होत असल्याने जिल्हय़ातील खगोलप्रेमींना खंडग्रास सूर्यग्रहण पाहण्याची पर्वणीच मिळाली. ग्रहणाचा कालावधी ३ तास २५ मिनिटे,३१ सेकंद एवढा होता.

शिवाजी विद्यापीठाने पन्हाळा येथील आवकाश संशोधन केंद्रात हे सूर्यग्रहण पाहण्याची व्यवस्था केली होती. तर विवेकानंद कॉलेज, खगोलप्रेमी वसंत गुंडाळे यांच्यासह शहरातील अनेक कुटुंबियांनी आपआपल्या घराच्या छतावरून हे सूर्यग्रहण पाहुन त्याची विविध दृश्ये सोशल मीडियावर शेअर केली.

हिंदुस्थानमध्ये पुढील तीन ग्रहण दिसणार नाहीत
संपूर्ण महाराष्ट्रात खंडग्रास सूर्यग्रहण तर देहरादूनमध्ये कंकणाकृती सूर्यग्रहणाचे दर्शन झाले. गतवर्षी केरळमधील पायणूर शहरात कंकनाकृती सूर्यग्रहण दिसले होते. आता यापुढे तब्बल चौदा वर्षांनी म्हणजे २०३४ साली कंकणाकृती सूर्यग्रहण दिसणार आहे. या वर्षात येत्या ५ जुलै रोजी सकाळी छायाकल्प चंद्रग्रहण, ३० नोव्हेंबर रोजी दुपारी चंद्रग्रहण आणि १५ डिसेंबर रोजी रात्री सूर्यग्रहणाची स्थिती आहे. पण ही तीनही ग्रहण हिंदुस्थानमध्ये दिसणार नसल्याचे काही तज्ञांकडुन सांगण्यात येत आहे.