विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या वतीने पुढील टप्पा अनुदान मिळावे यासाठी गेले 34 दिवस आंदोलन सुरू आहे. राज्य शासनाने आश्वासन देऊनही अद्यापि आदेश काढलेला नाही. टप्पावाढीचा आदेश तत्काळ काढावा, या मागणीसाठी कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाच्या वतीने शिक्षकदिनी उद्या (गुरुवार, 5 रोजी) रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. बंगळुरू महामार्गावरील तावडे हॉटेल येथे होणाऱ्या ‘रास्ता रोको’ आंदोलनामध्ये जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या प्राथमिक, खासगी प्राथमिक, महापालिका प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा बंद ठेवून सहभागी होणार आहेत.
शैक्षणिक व्यासपीठाच्या विद्याभवन येथील सभेत उद्याच्या ‘रास्ता रोको’चा निर्णय घेण्यात आला. शिक्षक आमदार प्रा. जयंत आसगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली व शैक्षणिक व्यासपीठाचे अध्यक्ष एस. डी. लाड यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा झाली. गुरुवारी होणाऱ्या ‘रास्ता रोको’ आंदोलनामध्ये शैक्षणिक व्यासपीठाअंतर्गत जिल्हा शिक्षण संस्था संघ, मुख्याध्यापक संघ यांसह जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक संघटना सहभागी होणार आहेत.
विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या वतीने अनुदानाचे पुढील टप्पे मिळावेत यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात विविध आंदोलने सुरू आहेत. कृती समितीचे उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे यांच्या नेतृत्वाखाली गेले 34 दिवस कोल्हापुरात शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर आंदोलने सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून खंडेराव जगदाळे व त्यांच्या तीन सहकाऱ्याचे आमरण उपोषण सुरू आहे. त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत आहे. अंशतः अनुदानित शाळांना 1 जून 2024पासून अनुदानाचा पुढील टप्पा मिळण्यासाठी सभागृहात घोषणा झाल्याप्रमाणे शासनआदेश काढणे, 15 मार्च 2024चा संचमान्यतेचा जाचक आदेश रद्द करावा यासाठी कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाने विनाअनुदानित कृती समितीच्या आंदोलनाला एकमुखाने पाठिंबा देण्याचा निर्णय कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाच्या विद्याभवन येथे झालेल्या सभेत घेतला होता.