
लॉकडाऊनचे कडक निर्बंध आणि ‘जनता कर्फ्यू’ पुकारूनही भाजीमंडईत होणारी दररोजची गर्दी पाहाता, कोरोना संसर्गाचा धोका अधिक वाढू नये, यासाठी शहरातील भाजीमंडई महापालिकेने बॅरिकेड्स लावून बंद करण्यात आल्या आहेत.
गेल्या काही दिवसांपासून जिह्यात कोरोनाचे रुग्ण मोठय़ा प्रमाणात आढळत असून, मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेची डोकेदुखी वाढली आहे. कडक निर्बंध आणि ‘जनता कर्फ्यू’ पुकारूनही सर्व भाजीमंडईत सकाळी खरेदीसाठी उसळणारी गर्दी धोकादायक ठरू लागली आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी महापालिकेच्या प्रशासक कादंबरी बलकवडे यांनी आजपासून भाजीमंडई बंद केल्या आहेत. विक्रेत्यांना घरोघरी फिरून विक्री करण्याच्या सूचना केल्या आहेत. महापालिकेचे उपआयुक्त व उपशहर अभियंता यांनी सकाळी सर्व मार्केटची तपासणी केली.































































