
राज्यासह आता मिनी मंत्रालय समजल्या जाणाऱया जिल्हा परिषदांमध्येही शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडीने जोरदार दणका देत भाजपला हद्दपार केले आहे. कोल्हापुरात भाजपचे उमेदवार अरुण इंगवले यांचा 17 मतांनी दारुण पराभव करीत महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे बजरंग ज्ञानू पाटील हे विजयी झाले. बजरंग पाटील यांना 41 मते पडली. उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीचे सतीश पाटील हे विजयी झाले, भाजपचे राहुल आवाडे यांचा पराभव केला. नाशिक जिल्हा परिषदेवर शिवसेनेचा भगवा डौलाने फडकला आहे. अध्यक्षपदी शिवसेनेचे बाळासाहेब क्षीरसागर, तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीचे डॉ. सयाजीराव गायकवाड यांची बिनविरोध निवड झाली आहे.
कोल्हापूर जिह्यात भाजपची दारुण अवस्था झाली आहे. जिह्यात भाजपचा आमदार नाही, खासदारही नाही, आता भाजपच्या हातातून जिल्हा परिषदही गेली आहे. शिवसेनेमुळे यापूर्वी अडीच वर्षे जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद भूषविणाऱया भाजपला आता महाविकास आघाडीमुळे जोरदार दणका बसला आहे. शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, कॅबिनेट मंत्री हसन मुश्रीफ, राज्यमंत्री सतेज पाटील यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱयांची महाविकास आघाडीची बैठक झाली. अध्यक्षपदी काँग्रेसचे बजरंग पाटील आणि उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीचे सतीश पाटील यांचे नाव निश्चित केले. कोल्हापूर जिल्हा परिषदेत अध्यक्षपदासाठी हात उंचावून मतदान घेण्यात आले. बजरंग पाटील यांना 41 मते तर भाजपचे अरुण इंगवले यांना अवघे 24 मते मिळाली. उपाध्यक्षपदासाठी सतीश पाटील यांनाही 41 मते मिळाली तर भाजपचे राहुल आवडे यांना अवघी 24 मते मिळाली. दहा सदस्य संख्याबळ असलेल्या शिवसेनेमुळे यंदा जिल्हा परिषदेत सत्तांतर घडले आणि भाजप हद्दपार झाली.
हिंगोली जि.प.च्या अध्यक्षपदी शिवसेनेचे गणाजी बेले
हिंगोली येथील जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी शिवसेनेचे गणाजी बेले यांची, तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीचे मनीष आखरे यांची गुरुवारी बिनविरोध निवड करण्यात आली. शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाआघाडीने जि.प. वरील सत्ता एकसंधपणे पुन्हा एकदा कायम राखली आहे.
हिंगोली जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शिवराणी नरवाडे व उपाध्यक्ष अनिल पतंगे यांचा अडीच वर्षांचा कार्यकाळ संपल्यामुळे नूतन अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीसाठी आज जि.प. सभागृहात विशेष बैठक घेण्यात आली. अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी आरक्षित असलेल्या अध्यक्षपदासाठी शिवसेनेचे जि.प. सदस्य गणाजी बेले यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची निर्विवाद बिनविरोध निवड झाली, तर उपाध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीकडून मनीष आखरे व यशोदा संजय दराडे यांनी अर्ज दाखल केले होते. दराडे यांनी अर्ज मागे घेतल्यामुळे आखरे यांचीही उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली.




























































