
स्टार प्रवाहवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेचं कथानक सध्या अतिशय उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचलं आहे. शालिनीचे डावपेच एकीकडे सुरू असताना गौरीदेखील खंबीरपणे या डावपेचांचा सामना करत आहे. शालिनीच्या प्रत्येक षड्यंत्रामध्ये तिची साथ देणारी सर्वात जवळची व्यक्ती म्हणजे देवकी.
देवकीशिवाय शालिनी अपूर्ण आहे. मालिकेतलं हे लोकप्रिय पात्र याआधी अभिनेत्री मीनाक्षी राठोड साकारत होती. मात्र मीनाक्षी खऱ्या आयुष्यात लवकरच आई होणार असल्याने ती प्रसूती रजेवर आहे. त्यामुळे यापुढे देवकी हे पात्र यापुढे अभिनेत्री भक्ती रत्नपारखी साकारताना दिसेल. ‘अग्गंबाई सासूबाई’ या मालिकेत भक्ती यापूर्वी झळकली होती. या मालिकेबाबत भक्ती म्हणाली, ‘देवकी हे अतिशय लोकप्रिय पात्र मला साकारायला मिळतंय याचा आनंद तर आहेच, मात्र जबाबदारीही वाढली आहे. भूमिकेसाठी कोल्हापुरी लहेजा आत्मसात करण्याचा प्रयत्न करतेय.























































