
पती-पत्नीतील वाद, कौटुंबिक गृहकलह अशा समस्या चुटकी वाजवत दूर करण्याचा दावा करत अनेकांची फसवणूक करणाऱया टिंबर मार्केट परिसरातील चुटकीवाल्या बाबाला अखेर करवीर पोलिसांनी ठाण्यातून अटक केली. सनी भोसले असे या भोंदूबाबाचे नाव आहे. न्यायालयाने भोंदूबाबा भोसलेला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
सनी भोसलेच्या भोंदूगिरीचे अनेक कारनामे बाहेर पडल्यानंतर पोलिसांनी कारवाई करण्यापूर्वीच तो पसार झाला होता. वाई, मुंबई, ठाणे अशा भागांत वावरत असल्याच्या माहितीनंतर करवीर पोलिसांनी त्याला अटक केली. पोलीस तपासात त्याचे अनेक काळे कारनामे बाहेर येण्याची शक्यता आहे.
कोल्हापुरातील फुलेवाडी रिंगरोड परिसरातील क्रांतिसिंह नाना पाटील नगरात चार खोल्यांच्या घरात दरबार भरवून, चुटकी वाजवत नागरिकांच्या समस्या दूर करण्याची भोंदूगिरी करत सनी भोसलेने गेल्या अनेक वर्षांपासून बस्तान बसविले होते. कोल्हापूर जिह्यासह कर्नाटकातूनही लोक त्याच्याकडे येत होते. अमावास्या, पौर्णिमेला या ठिकाणी मोठी गर्दी झालेली असायची. भगव्या कपडय़ात धडकी भरवणारे त्याचे हास्य, सावज हेरून विशेषतः महिलांशी संवाद, संमोहित करण्याची कला या भोंदूबाबाचे वैशिष्टय़ होते. अनेक उच्चभ्रू महिलाही त्याच्या संपर्कात होत्या.
अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि कोल्हापूर पोलिसांच्या पथकाने तक्रारी आल्यानंतर त्याच्यावर पाळत ठेवली होती. अनेक महिलांचे लैंगिक शोषण तसेच काही विवाहित महिलांनाही पळवून नेल्याची, आर्थिक फसवणूक केल्याचेही त्याचे कारनामे बाहेर येऊ लागले होते. यातूनच दोन दिवसांपूर्वी दरबार भरणाऱया ठिकाणावर छापा टाकून पोलिसांनी भूतबाधा, करणी उतरविण्याचे तसेच गर्भनिरोधक साहित्य जप्त केले होते. यावेळी भोंदूबाबाने कोल्हापुरातून पळ काढल्याने त्याचा शोध सुरू होता. सनी भोसले मुंबईतील ठाण्यात असल्याची माहिती करवीर पोलिसांच्या पथकाला मिळाली. पोलिसांनी त्याला शनिवारी मध्यरात्री बेडय़ा ठोकल्या. त्याला आज न्यायालयासमोर हजर केले, असता पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनाविण्यात आली.
फसवणूक झालेल्यांना पोलिसांचे आवाहन
घरातील वाद, कुटुंबातील समस्या घेऊन येणाऱयांना भोंदूबाबा फसवायचा, यामध्ये जिह्यातील आणि जिह्याबाहेरील अनेकांची फसवणूक झाल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. फसवणूक झालेल्यांनी सनी भोसले या भोंदूबाबा विरोधात पोलिसात तक्रार दाखल करावी, असे आवाहन करवीर ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांनी केले आहे.
महिलांच्या नावांवर घेतले सीम कार्ड
भोंदूबाबा सनी भोसले याने शिताफीने मोबाईलची सिमकार्ड अनेक महिलांच्या नावावर घेतले असून, त्याचाही तपास करवीर पोलीस करत आहेत. समाजातील अशा प्रवृत्तीला थारा न देता जनतेने सावध राहावे, असे आवाहनही कोल्हापूर पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.




























































