
कोरोना महामारीमुळे जगभरात सर्वसामान्यांच्या जीवनशैलीत मोठा बदल झाला असून याचा प्रभाव आता दैनंदिन आयुष्यासोबत सणांमध्येही पाहायला मिळत आहे. मास्क, सॅनिटायझर हे आता प्रत्येकाच्या रोजच्या वापराचा भाग झाले आहेत व बदलाचा परिणाम आपल्या देवी-देवतांच्या उत्सवातही दिसायला लागला आहे. त्याचे असे झाले की, कोलकात्यात रविवारी एका देवीच्या मूर्तीचे अनावरण करण्यात आले आहे. या देवीच्या मूर्तीला चक्क दोन तोळे सोन्याचा मास्क घालण्यात आला आहे. इतकेच नाही तर आईच्या हातांमध्ये निर्जंतुकीकरण करण्यासाठी लागणाऱया वस्तू दाखवण्यात आल्या आहेत. या मूर्तीचे काम सध्या सुरू असून रविवारी फक्त तिची एक झलक दाखवण्यात आली. मात्र ही मूर्ती सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
कोलकाता येथे तृणमूलच्या आमदार आणि बंगाली गायक अदिती मुन्शी यांनी बसवलेल्या देवीच्या मूर्तीच्या हातामध्ये मास्क, थर्मल गन तसेच इतर गोष्टी ठेवण्यात आल्या असून याद्वारे लोकांना सुरक्षित राहण्याचा संदेश देण्यात आला आहे. कोरोनाच्या या संकटात आरोग्य आणि सुरक्षा किती महत्त्वाची आहे यासाठी जनजागृती करण्याचा प्रयत्न असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे. ‘सोन्याचा मास्क हा खूप मोठा दागिना म्हणून पाहू नका,’ असे आवाहन तृणमूलच्या आमदार अदिती मुन्शी यांनी केले आहे.
देवी माँला सोन्याचा मास्क हा जनजागृतीसाठीच
‘बंगालमधील प्रत्येक मुलगी ही गोल्डन गर्ल असून प्रत्येक पालक आपल्या मुलीला सोन्याने मढवू इच्छित आहे अशी यामागे कल्पना आहे. आम्ही वेडे म्हणून देवी माँला दोन तोळ्याचा मास्क लावलेला नाही. आम्ही कोरोनाच्या काळात लोकांमध्ये जनजागृती करण्याचा इच्छेने हे केले आहे,’ असेही मुन्शी यांनी म्हटले आहे. गतवर्षी कोरोना संकटामुळे कोलकाता हायकोर्टाने पूजा मंडपात उपस्थित न राहण्यासंबंधी आदेश दिले होते. दरम्यान, या वर्षी लोक पुन्हा एकदा नवरात्रीच्या निमित्ताने सण साजरा करण्यासाठी तयारी करत आहेत, अशी माहिती तृणमूल आमदार अदिती यांनी दिली.
























































