
सामना ऑनलाईन। कोलकाता
पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी यांचा तृणमूल काँग्रेस पक्ष आणि ममतादीदी गेले काही वर्षे देशातील राजकारणात मागे पडल्याचे चित्र आहे. तृणमूलमधील अनेक खासदार आणि आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्या पार्श्वभूमीवर तृणमूल पक्षाचा ‘मेकओव्हर’ करण्यासाठी आणि ब्रँड ममता तयार करण्यासाठी राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर याची मदत घेतली जाणार आहे.
तृणमूलच्या अध्यक्षा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आक्रमक भाषा, आक्रमक विचार यासाठी ओळखल्या जातात. मात्र, किशोर यांच्या राजकीय मार्गदर्शनाखाली भविष्यात ममतादीदी मृदू आणि कमी आक्रमक पाहायला मिळणार आहे. 2021च्या पश्चिम बंगालमधील विधानसभेची निवडणूक डोळय़ांसमोर ठेवून हा मेकओव्हर करण्यात येत आहे. भाजपसारख्या विशिष्ट विचारसरणी आणि कॉर्पोरेट कंपनीसारखा सेटअप असलेल्या राजकीय पक्षाशी कसे लढावे हे किशोर सांगणार आहेत, असे तृणमूलच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले. तळागाळातील लोकांना पक्षाशी जोडण्यासाठी किशोर यांच्या मार्गदर्शनाखाली ‘दीदी के बोलो’ (दीदीला सांगा) नावाने मोहीम सुरू केली आहे.



























































