कोलवडे येथे डम्पिंग ग्राऊंड नकोच, उपजिल्हाधिकाऱ्यांना ग्रामस्थांचा घेराव

ताराबाई परिसरात रोज निर्माण होणारा हजारो टन कचरा टाकण्यासाठी पालघर जिल्हा प्रशासन कोलवडे गावाजवळ खासगी जागा विकत घेणार आहे. याबाबत प्रस्ताव तयार केल्यानंतर उपजिल्हाधिकाऱ्यांनी या भागात जाऊन जागेची पाहणी केली. मात्र ग्रामपंचायत तसेच ग्रामस्थांना विश्वासात न घेताच हा प्रकल्प माथी मारला जात असल्याने संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी उपजिल्हाधिकाऱ्यांना घेराव घालत डम्पिंग ग्राऊंडला विरोध केला.

तारापूर औद्योगिक क्षेत्रामुळे बोईसर, सरावली, कोलवडे, कुंभवली, पाम, सालवड, पास्थळ, खैरापाडा, बेटेगाव, मान या गावांत झपाट्याने नागरीकरण वाढले असून दररोज सुमारे 50 ते 60 टन कचरा जमा होतो. या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी कायमस्वरूपी जागा नसल्याने परिसरात सर्वत्र कचऱ्याचे ढीग साचले आहेत. त्यामुळे परिसरातील पर्यावरण आणि नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे.

… अन्यथा आंदोलन करू

संयुक्त घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी तारापूर परिसरात शासकीय जागा उपलब्ध नसल्याने जिल्हा प्रशासनाने कोलवडे ग्रामपंचायत हद्दीतील खासगी जागा खरेदीचा प्रस्ताव जवळपास अंतिम केला आहे. पालघरच्या उपजिल्हाधिकाऱ्यांनी प्रस्तावित जागेची पाहणी केली. मात्र या पाहणीवेळी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच स्थानिक नागरिकांनी प्रकल्पाविरोधात तीव्र भूमिका घेतली. ग्रामपंचायत आणि नागरिकांना विश्वासात न घेता जबरदस्तीने प्रकल्प उभारण्याचा प्रयत्न झाल्यास तीव्र आंदोलन करू, असा इशारा नागरिकांनी दिला आहे.