
कोकणच्या नैसर्गिक संपत्तीला धक्का न लावता कोकणात विकास प्रकल्प सुरू करावेत, असा आग्रह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आहे. त्यानुसार कोकणात विविध प्रकल्प राबविले जात असल्याची माहिती उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी आज मुंबईत आयोजित केलेल्या कोकण उद्योग परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी दिली.
कोकण भूमी प्रतिष्ठान आणि कोकण बिझनेस फोरम यांच्यावतीने आयोजित कोकण उद्योग परिषदेचे उद्घाटक म्हणून देसाई बोलत होते. कोकणात पर्यटन विकासाला मोठी संधी आहे. शासनाने नुकतेच पर्यटन क्षेत्राला उद्योगांचा दर्जा दिला आहे. त्यामुळे कोकणात हॉटेल्स व्यवसाय वाढणार आहे. याद्वारे स्थानिकांना रोजगारांची संधी उपलब्ध होईल. हे करत असताना कोकणातील रमणीय वातावरण, येथील निसर्ग सौंदर्य टिकले पाहीजे, असा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आग्रह आहे. असे देसाई यांनी नमूद केले.
कोकण किनारपट्टी व पर्वत रांगेत पॅराग्लायडींग, राफ्टींग या खेळांना शासनाने सहासी खेळांचा दर्जा दिला आहे. त्याला यामुळे आगामी काळात या खेळांना अधिक चालना मिळेल, असा विश्वास देसाई यांनी व्यक्त केला.


























































