
सामना प्रतिनिधी। रत्नागिरी
निवडणुकीत मोठय़ा प्रमाणावर पैसा खर्च केला जातो. या खर्चावर देखरेख ठेवण्याचे काम निवडणूक आयोग करत असते. उमेदवाराने केलेल्या खर्चाचे मोजमाप करण्यासाठी निवडणूक आयोगालाही दरपत्रक तयार करावे लागते. यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठीही आयोगाने दरपत्रक जाहिर केले आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे दरपत्रक निश्चित करण्यात आले आहे. या दरपत्रकानुसार उमेदवारांच्या खर्चाची नोंद होणार आहे. निवडणुकीदरम्यान काम करणाऱया कर्मचाऱयांचे वेतन, भाडय़ाने वापरण्यात येणाऱया गाडय़ांचे दर निश्चित करण्यात आले आहेत.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात वडापाव आणि पॅटीस प्रत्येकी 15 रुपये, पोहे आणि उपमा प्रत्येकी 30 रुपये, चहा साधा 8 तर स्पेशल चहा 15 रुपये, शाकाहारी थाळी 100 रुपये, स्पेशल शाकाहारी थाळी 150 रुपये, अंडाकरी थाळी 90 रुपये, मटण, चिकन, मच्छी थाळी प्रत्येकी 250 रुपये, पाण्याची बाटली 15 रुपये, शीतपेय 15 रुपये दर असेल.
स्पीकर प्रतिदिनी 354 रुपये, झेंडे 35 पासून 60 रुपयांपर्यंत, टोपी 25 रुपये, बिल्ले 10 रुपये, छायाचित्र 20 रुपये, अगदी मंडप, खुर्च्या हारतुऱयांपासून फटाक्यांपर्यंत दर निश्चित करण्यात आले आहेत.
दरपत्रकाप्रमाणेच हिशेब द्यावा लागणार
निवडणुकीत प्रत्येक उमेदवाराला आपल्या खर्चाचा हिशेब द्यावा लागतो. लोकसभा निवडणुकीत प्रत्येक लोकसभा मतदारनिहाय निवडणूक खर्चाचे दरपत्रक निश्चित केले जाते. या दरपत्रकाप्रमाणेच उमेदवारांना आपल्या खर्चाचा तपशील द्यावा लागतो.
असे असतील दर (रु.)
वडापाव – 15
पोहे – 30
चहा – 8
मटण थाळी – 250
शाकाहारी थाळी 100
टाचणीपासून ट्रकपर्यंत
निवडणूक काळात कार्यालयात वापरण्यात येणाऱया टाचणीपासून प्रचारामध्ये वापरण्यात येणाऱया ट्रकपर्यंतच्या खर्चाचा हिशेब दरपत्रकाप्रमाणे द्यावा लागणार आहे. ढोल वादन पथक, पोवाडे, पथनाटय़ पथकाचे मानधन निश्चित करण्यात आले आहे. पोवाडा पथकाला दोन हजार रुपये तर पथनाटय़ पथकाला चार हजार रुपये दर मोजवा लागणार आहे.




























































