
गणपती बाप्पा मोरया… मंगलमूर्ती मोरया… पुढच्या वर्षी लवकर या.. अशा जयघोषात रविवारी कुडाळ तालुक्यासह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दीड दिवसांच्या गणपती बाप्पांचे मोठया थाटात भक्तीमय वातावरणात विसर्जन करण्यात आले.
कोकणात दिड, पाच, सात, अकरा, सतरा, एकवीस दिवस असे गणपतीचे घरोघरी पूजन केले जाते. शनिवार पासून सर्वत्र गणेशोत्सवाला मोठय़ा थाटात प्रारंभ झाला. यावर्षी कोरोना महामारीचे संकट असतांनाही मोठय़ा उत्साहात गणपती बाप्पांचे घरोघरी आगमन झाले. रविवारी सायंकाळी कुडाळसह सावंतवाडी, कणकवली, वैभववाडी, देवगड, मालवण, वेंगुर्ले, दोडामार्ग तालुक्यातील शहरासह ग्रामीण भागातील दीड दिवसांच्या गणपती बाप्पांचे भक्तीभावाने विसर्जन करण्यात आले.
दरवर्षी गणपती विसर्जन मिरवणूक, ढोलताशांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी करीत मोठय़ा धूमधडाक्यात विसर्जन मिरवणूक काढली जात असे. यावर्षी मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टानिंगचे पालन करीत विसर्जन मिरवणूका न काढता बाप्पांना भक्तीभावाने निरोप देण्यात आला. कुडाळ शहरातील भंगसाळ नदीसह ग्रामीण भागातील नदी, तलाव, ओहोळ आदी ठिकाणी दीड दिवसांच्या गणपतींचे विसर्जन करण्यात आले. कुडाळ महापुरूष मंदीर येथे नगरसेवक सचिन काळप, सामाजिक कार्यकर्ते शैलेश काळप व काळपवाडी-लक्ष्मीवाडीतील युवकांच्या सहकार्याने बनविण्यात आलेल्या जेटीच्या सहाय्याने भंगसाळ नदीत श्रींचे विसर्जन करण्यात आले.
याठिकाणी नगरसेवक सचिन काळप, शैलेश काळप, केदार काळप, सिद्धांत काळप, कुंदन आंगचेकर, ओंकार काळप, सागर काळप, आशिष काळप, सिद्धेश पालव, गोटय़ा धुरी, निकेश काळप आदींसह स्थानिक युवकांनी जेटीच्या सहाय्याने गणेश मुर्ती विसर्जन करण्यासाठी सहकार्य केले. शहरात ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. रात्री उशीरापर्यंत गणपती बाप्पाला निरोप देण्याचा उत्साह सुरू होता.

































































