गणेशभक्तांची परतीच्या प्रवासात प्रचंड रखडपट्टी, कोकण रेल्वेच्या जादा गाड्या उशिराने मुंबईत

गौरी-गणपतीचे विसर्जन करून मुंबई-ठाण्याच्या परतीच्या प्रवासासाठी निघालेल्या गणेशभक्तांची प्रचंड रखडपट्टी होऊ लागली आहे. कोकण रेल्वे मार्गावर मध्य आणि पश्चिम रेल्वेने सोडलेल्या जादा गाडय़ांसह नियमित गाडय़ांचेही वेळापत्रक कोलमडले आहे. गुरुवारी सलग दुसऱ्या दिवशी जादा गाडय़ा उशिराने मुंबईत दाखल झाल्या. त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले.

कोकणात मोठय़ा प्रमाणावर घरोघरी गणेशोत्सव साजरा होत असल्याने लाखो गणेशभक्त सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिह्यांतील गावी गेले होते. मंगळवारी सात दिवसांच्या मुक्कामी राहिलेल्या गणपती बाप्पाचे गौराई मातेसह विसर्जन करण्यात आले. त्यानंतर बहुतांश गणेशभक्तांनी मुंबई-ठाण्याच्या दिशेने परतीचा प्रवास सुरू केला. यंदा मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेमार्फत कोकण रेल्वे मार्गावर 380 गणपती स्पेशल गाडय़ा सोडण्यात आल्या आहेत. या स्पेशल गाडय़ा आणि नियमित गाडय़ांचे नियोजन करताना रेल्वे प्रशासनाची दमछाक झाली आहे. राजापूरपासून नागोठण्यापर्यंत जागोजागी क्रॉसिंगसाठी गाडय़ा थांबवल्या जात आहेत. त्यामुळे नियमित प्रवास वेळेपेक्षा तब्बल सात ते आठ तास उशिराने गणेशभक्त मुंबई, ठाण्यात पोहोचत आहेत. अनेक जादा गाडय़ांना मर्यादित स्थानकांवर थांबे देण्यात आले. त्यामुळे त्या गाडय़ा वेळेत मुंबईत पोहोचतील, अशी अपेक्षा प्रवाशांना होती. मात्र प्रवासात वारंवार अर्धा तास गाडी थांबून ठेवली गेल्याने मुंबई-ठाणे गाठेपर्यंत गणेशभक्तांना रखडपट्टीचा मोठा मनस्ताप सहन करावा लागला.

कणकवली ते मुंबईच्या प्रवासात आम्हाला 17 तास लागले. आम्ही उधना एक्स्प्रेसने प्रवास करीत होतो. या गाडीला मर्यादित स्थानकांत थांबे होते. मात्र क्रॉसिंगला अनेकदा गाडी थांबवल्यामुळे मुंबईत पोहोचायला सात तास अधिक लागले.

n दीपक कोदे, मुंबई

तुतारी एक्स्प्रेसच्या प्रवासात घुसमट

तुतारी एक्स्प्रेसमधून परतीचा प्रवास करणाऱ्या गणेशभक्तांची गर्दीत घुसमट झाली. गाडी अपग्रेड करण्याची घोषणा दोनदा झाली. मात्र त्याची अंमलबजावणी शून्य आहे. परिणामी प्रवाशांना आरामदायी प्रवास करणे शक्य नाही, अशी नाराजी कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे सचिव अक्षय म्हापदी यांनी व्यक्त केली. दरवर्षीप्रमाणे यंदाही जनरल डब्यामध्ये खचाखच गर्दी होती. गुरुवारी दुसऱ्या दिवशीही पाय ठेवायला जागा शिल्लक नव्हती.