पोलीस भरतीच्या तयारीसोबत फुलवली पिवळय़ा कलिंगडाची शेती

पारंपरिक शेतीला बगल देऊन नवनवीन पिके घेतली तर कोकणातील शेती नक्कीच फायदेशीर ठरू शकते हे मालवणच्या आचरा गावातील सुपुत्र विक्रांत आचरेकरने सिद्ध करून दाखकले आहे. पोलीस भरतीची तयारी करताना लॉकडाऊनमध्ये मिळालेला मोकळा वेळ सत्कारणी लावत त्याने विशाला, आरोही, शुगरक्कीन, ममद अशा चार प्रकारच्या कलिंगडांची लागवड केली आहे. शेतीमध्ये त्याने केलेल्या या भन्नाट प्रयोगाचे सध्या सर्वत्र कौतुक होतेय.

शेतीची साथ सोडणार नाही !

लॉकडाऊनमुळे एक गोष्ट आयुष्यात शिकलो, तुमच्याकडे मेहनत करण्याची इच्छा असेल तर नक्कीच आयुष्यात मार्ग दिसेल. पोलीस तर मी होईनच पण ज्या शेतीने मला जगवले, आयुष्य जगायला शिकवले त्या शेतीची साथ कधीच सोडणार नाही, असे विक्रांतने सांगितले.

सर्कसामान्यांप्रमाणे बारावीनंतर पुढे काय करायचे, असा प्रश्न विक्रांतपुढे देखील होता. त्याने पोलीस भरतीसाठी पुण्यात एका ऍकॅडमीत प्रवेश घेतला. परंतु लॉकडाऊनमुळे तो गावीच अडकला. घरची परिस्थिती बेताची असल्याने कामाशिवाय घरी बसून राहणे त्याला शक्य नव्हते. साधारणतः भातशेती केल्यानंतर कोकणात शेतजमीन पडीकच असते. शेतीशिवाय उत्पन्नाचे इतर साधन नसल्याने शेतीमध्ये काय नवीन प्रयोग करता येईल याचा विचार विक्रांतने केला. नवीन मयेकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्याने पिवळ्या कलिंगडाची शेती करायचे ठरवले.

सुरुवातीला त्याच्या या निर्णयाला अनेकांनी विरोध केला. परंतु कोकणच्या मातीत सर्व प्रकारची पिके येऊ शकतात हे त्याला सिद्ध करून दाखवायचे होते. चार प्रकारच्या कलिंगडाची त्याने लागवड केली असून सोशल मीडियाकर योग्य मार्केटिंग केल्यामुळे घरबसल्या त्याच्या कलिंगडाची विक्री होत आहे. तसेच आंतरपीक म्हणून मिरची, झेंडू, शेवंती, गाजर आदींची त्याने लागवड केली असून त्यातूनही त्याला भरघोस नफा मिळत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या