
कोकण रेल्वे मार्गावर आणखी 6 रेल्वेगाड्या डिझेल इंजिनऐवजी विजेवर चालवण्याचे नियोजन रेल्वे प्रशासनाने केले आहे. नियमितपणे धावणाऱ्या दिवा- सावंतवाडी एक्स्प्रेससह अन्य 5 साप्ताहिक एक्स्प्रेस गाड्यांचा समावेश आहे. यामुळे विद्युत इंजिनावर धावणाऱ्या रेल्वेगाड्यांची संख्या 29वर पोहचणार आहे.
रेल्वे प्रशासनाने जाहीर केल्यानुसार 12223/12324 क्रमांकाची लोकमान्य टिळक टर्मिनस-एर्नाकुलम द्वि साप्ताहिक एक्स्प्रेस 14 फेब्रुवारीपासून, तर परतीच्या प्रवासात 15 फेब्रुवारीपासून विद्युत इंजिनासह धावणार आहे. 22150/22149 क्रमांकाची पुणे- एर्नाकुलम द्विसाप्ताहिक एक्स्प्रेस 15 फेब्रुवारीपासून विद्युतशक्तीवर धावेल. 11099/11100 क्रमांकाची आठवड्यातून 4 दिवस धावणारी लोकमान्य टिळक टर्मिनस-मडगाव एक्स्प्रेस 18 फेब्रुवारीपासून विजेवर धावणार आहे. 12133/12134 क्रमांकाची नियमितपणे धावणारी सीएसएमटी मुंबई- मंगळूर नियमित एक्स्प्रेस 16 फेब्रुवारीपासून, तर परतीच्या प्रवासात 17 फेब्रुवारीपासून विद्युतशक्तीवर धावणार आहे.
10105/10106 क्रमांकाची दिवा- सावंतवाडी नियमित एक्स्प्रेस 12 फेब्रुवारीपासून तर परतीच्या प्रवासात 13 फेब्रुवारीपासून विद्युत इंजिनासह धावत आहे. 50107/50108 क्रमांकाची सावंतवाडी-मडगाव नियमित एक्स्प्रेस 13 फेब्रुवारीपासून विजेवर धावू लागली असल्याचे रेल्वेने स्पष्ट केले आहे. कोकण रेल्वे मार्गाचे संपूर्ण विद्युतीकरण पूर्ण झाल्याने एकामोगामाग एक रेल्वेगाड्या विद्युतशक्तीवर धावत आहेत. आतापर्यंत 23 रेल्वेगाड्या विद्युतशक्तीवर धावत होत्या. यात आणखी 6 गाड्यांची भर पडल्याने ही संख्या 29 वर पोहचणार आहे. विजेवर धावणाऱ्या रेल्वेगाड्यांमुळे प्रवाशांचा प्रवास वेगवान व प्रदूषणमुक्त होत आहे.






























































