शिवसेनेच्या दणका, पावशीत कार्पेट डांबरीकरण सुरू

836

कुडाळ – मालवण विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना आमदार वैभव नाईक यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाअंतर्गत विविध समस्यांबाबत आक्रमक पवित्रा घेत हायवे व ठेकेदार कंपनीच्या अधिका-यांना घेराव घातला होता. यावेळी पालकमंत्री ना.दीपक केसरकर यांनी अधिका-यांना महामार्गावर कार्पेट डांबरीकरणासह आवश्यक उपाययोजना तातडीने करण्याच्या सुचना दिल्या होत्या. तसेच आ.नाईक यांनी याबाबत सतत पाठपुरावा सुरूच ठेवला होता. अखेर पावशी येथे महामार्गावर ठिकठिकाणी कार्पेट डांबरीकरण करण्याचे काम ठेकेदार प्रशासनाकडून हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे वाहनधारक व नागरीकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.

मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाचे काम सध्या युध्दपातळीवर सुरू आहे. बहुतांशी ठिकाणी नवीन लेन तयार झाल्या आहेत. ब्रीजचेही काम प्रगतीपथावर आहे. मात्र कुडाळ ते ओरोस दरम्यान ठिकठिकाणी सर्व्हीस रस्ते नादुरुस्त बनले, त्यामुळे धुळीसह अन्य समस्यांना वाहनधारकांना प्रवास करताना सामोरे जावे लागते. तसेच पावसाळ्यात कुडाळ, पावशी, वेताळबांबर्डेत पुराची समस्या निर्माण झाली होती. दरम्यान पालकमंत्री ना.दीपक केसरकर यांनी चार दिवसांपूर्वीच झाराप ते ओरोस दरम्यान महामार्ग चौपदरीकरण कामाची अधिका-यांसमवेत पाहणी करून आढावा घेत आवश्यक त्या सुचना दिल्या होत्या. या पाहणी दरम्यानच महामार्गाच्या दुरवस्थेबाबत आमदार वैभव नाईक यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत कुडाळ येथे महामार्ग प्राधिकरण व दिलिप बिल्डकॉन या ठेकेदार कंपनीच्या अधिका-यांना पालकमंत्री ना.दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत घेराव घालत जाब विचारला होता. त्यावेळी ना.केसरकर यांनी आ.नाईक व पदाधिकारी यांच्या मागण्या योग्य असून तातडीने सर्व्हीस रस्त्यांसह ठिकठिकाणच्या अर्धवट भागात कार्पेट डांबरीकरण करावे, तसेच सुरक्षेच्या दृष्टीने अन्य आवश्यक उपाययोजना तातडीने करण्याच्या सुचना संबंधित अधिका-यांना दिल्या होत्या. तसेच दोन दिवसांपूर्वीच पावशी येथे सरपंच बाळा कोरगांवकर यांच्या नेतृत्वाखाली पावशीतील ग्रामस्थांनी ठेकेदार कंपनीचे डंपर रोखत आधी खड्डे बुजवा, सर्व्हीस रस्ते डांबरीकरण करा आणि मगच काम करा अशी आग्रही भूमिका घेतली होती. याबाबत सरपंच बाळा कोरगांवकर यांनी आ.नाईक यांना कल्पना देत त्यांचे लक्ष वेधले होते. त्यावेळी आमदार नाईक यांनी महामार्ग प्रश्नी सतत पाठपुरावा सुरूच ठेवला होता. अखेर शुक्रवार पासून पावशी येथे सर्व्हीस रस्ता व खड्ड्यांच्या ठिकाणी कार्पेट डांबरीकरण करण्याचे काम ठेकेदार प्रशासनाने हाती घेतले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या