
कोकण रेल्वेची सेवा मंगळवारी रात्री जवळपास दीड तास ठप्प झाली होती. खेड-दिवाणखवटी स्थानकांदरम्यान सायंकाळी साडेसातच्या सुमारास ओव्हरहेड वायर तुटली. त्यामुळे कोकणात जाणाऱ्या आणि मुंबईकडे येणाऱ्या एक्स्प्रेसचा खोळंबा झाला. परिणामी, चाकरमान्यांची रखडपट्टी होऊन प्रचंड हाल झाले.
मुंबईकडे जाणारी मांडवी एक्स्प्रेस खेड स्थानकातच थांबवून ठेवण्यात आली होती. तसेच चंदिगडला जाणारी गोवा संपर्कक्रांती एक्स्प्रेस अंजनी स्थानकात थांबवण्यात आली होती. दीड तासाने ओव्हरहेड वायरचे दुरुस्ती काम पूर्ण झाले आणि वाहतूक सुरू करण्यात आली. मात्र त्यानंतर धावणाऱ्या गाड्यांनाही विलंब झाला.































































